Pune News : सर्वच व्यावसायिकांसाठी पूर्वीच्याच वेळा कायम कराव्यात – आमदार सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज – कोविडची साथ नियंत्रणात येऊ लागल्याने सर्वच व्यावसायिकांना साथीच्या पूर्वी व्यवसायाच्या ज्या वेळा होत्या त्याच वेळांमध्ये व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.

कोविड साथीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आज (शुक्रवारी) आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत बोलताना आमदार शिरोळे म्हणाले, साथीच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊन, सर्वच व्यावसायिकांवर निर्बंध ही पावले उचलली गेली. व्यावसायिकांनीही त्या बाबतीत सरकारला सहकार्य केले. निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले आहेत. तरी, आर्थिक उलाढालीला मोठी चालना मिळालेली नाही. निर्बंध पूर्णपणे उठवून सर्वच व्यावसायिकांना, व्यवसायासाठी साथीच्या अगोदर ज्या वेळा होत्या त्या देण्यात याव्या.

या मागणीबाबत आठ ऑक्टोबर रोजी निर्णय घेऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 50हजार रुपयांची भरपाई दिली जाईल असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जाहीर केले आहे. या योजनेपासून कोणतेही पीडित कुटुंब वंचित राहू नये याकरिता नागरिकांना अधिक माहिती आणि मार्गदर्शन सरकारने उपलब्ध करुन द्यावे, अशीही सूचना आमदार शिरोळे यांनी केली.

शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शाळा सुरु होताना जसे राष्ट्रगीत लावले जाते तसेच राष्ट्रगीतापाठोपाठ कोविडच्या सूचनाही दररोज दिल्या जाव्यात, अशी सूचनाही आमदार शिरोळे यांनी केली. या सूचनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.