Pune News : यंदाही शहरात गणेश विसर्जनासाठी फिरते हौद

एमपीसी न्यूज – गतवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेकडून फिरत्या विसर्जन हौदांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फिरत्या हौदांची ही सुविधा महापालिकेत नव्याने समावेश झालेल्या 23 गावांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र, नागरिकांनी घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी दरवर्षी महापालिकेकडून नदी पत्रातील घाट व विविध ठिकाणी विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यात येते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी पालिकेने गणेशभक्तांची गर्दी टाळण्यासाठी घाट व विसर्जन हौदांची व्यवस्था न करता फिरत्या विसर्जन हौदांची व्यवस्था केली होती.

यंदाही गतवर्षीप्रमाणे महापालिका विसर्जन घाट व हौदांची व्यवस्था न करताना शहरात फिरते विसर्जन हौदांची सुविधा उपलब्ध करणार आहे. तसेच पालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या गावांमध्येही 23 फिरत्या हौदांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, मागील वर्षी शहरात गणेश विसर्जनानंतर कोरोनाची साथ वेगाने वाढली होती. त्यामुळे यंदा राज्य शासनाने गणेशोत्सवापूर्वीच प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर केली आहे. त्यात, घरगुती मुर्तीसाठी 2 फूटांची उंची निश्चित करून देण्यात आली आहे. तसेच गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.