Pune News : राज्यात कायद्याचा धाक का नाही –  चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – मुंबईत साकीनाका येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेमधील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यात पोलिसांचा आणि कायद्याचा धाक का निर्माण होत नाही, याचा महाराष्ट्र विकास आघाडी शासनाने विचार करावा, असे सांगितले.

राज्यात गेल्या काही दिवसांत एका पाठोपाठ अशा घटना घडत आहेत. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गुन्ह्यांच्या तपासावर देखरेख ठेऊन गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, साकीनाका येथे घडलेली घटना भीषण आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. गुन्हेगारांची झटपट जामीनावर सुटका होते. त्यानंतर वर्षानुवर्षे असे खटले चालू राहतात. त्यामुळे या खटल्यांची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करायला हवी.

त्यांनी सांगितले की, राज्यात महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते वेगवेगळ्या अपराधाच्या घटनांमध्ये सापडत आहेत, पण कारवाई होत नाही. पोलिसांवर दबाव आणला जातो. त्यामुळे गुन्ह्यातील प्रमुख आरोपीला अटक होत नाही. तसेच कमी प्रभावाची कलमे लावली जातात. औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आघाडीच्या अध्यक्षावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला. पण अजूनही अटक झालेली नाही.

ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे. आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या करण्यात येत आहेत. सरकारच्या मनाविरुद्ध वागला की, ताबडतोब बदली केली जाते. प्रशासन आणि सरकारच्या सांगण्यावरून विरोधी कार्यकर्त्यांना अडकविण्याचा मोठा उद्योग पोलिसांकडून सुरू आहे. राजकीय आंदोलन असले तरीही मोक्काची नोटीस देणे, तडीपारी करणे, पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास भाग पाडणे अशा प्रकारांचा अतिरेक सुरू आहे. कायद्याचा दुरुपयोग केला जात आहे.

पत्रकारांना धक्काबुक्कीचा निषेध

मुंबईत लालबाग येथे पत्रकाराला पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की आणि शिवीगाळीचा पाटील यांनी निषेध केला. ते म्हणाले की, कोविडच्या आचारसंहितेचा अतिरेक सुरू आहे. त्याचा राजकीय सोईनुसार वापर करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या नेते कार्यकर्त्यांना सूट आणि इतरांवर कारवाई असा प्रकार सुरू आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.