Pune News : कोविड काळात केलेल्या कामांचे होणार ऑडिट

एमपीसी  न्यूज – कोरोना नियंत्रणासाठी देण्यात आलेल्या सर्व कामांचे लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळातील सर्व बिले आणि टेंडर यादी लेखापरीक्षणासाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने सर्व खाती आणि क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे आरोप यापूर्वी करण्यात आले होते.  

 कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर कोरोनावरील औषध उपचारापासून क्वारंटाईन सेंटर, रुग्णालयाची उभारणी, विस्थापीत मजुरांसाठी कॅम्प, लॉकडाउनपासून रुग्ण व विस्थापितांची भोजन व्यवस्था, स्वाब सेंटर्सची उभारणी, लसीकरण केंद्रांची उभारणी, स्मशानभूमीचे अद्ययावतीकरण, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणांपासून अनेक वस्तुंची खरेदी तसेच कामे करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार तसेच स्थायी समितीनेही यासंदर्भातील सर्व अधिकार महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार प्रशासनाने ६७ (३) नुसार कामे व खरेदी केली. तसेच यासंदर्भातील प्रस्तावही नंतर मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवले होते. या कामांमध्ये अफरातफर झाल्याची शक्यता व्यक्त करत या कामावरून आणि त्याच्या बिलावरून नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने तेव्हा कुठला निर्णय घेतला नव्हता. मात्र आता या सगळ्या बिलांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

त्यानुसार मार्च २०१९ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम ६७ (३) क अंतर्गत कोव्हीड निर्मुलन संदर्भात खर्ची पडलेल्या टेंडर, बिलांची लेखापरीक्षणासाठी यादी उपलब्ध करून देण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने सर्व खाती आणि क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.