Pune News : विधी सल्लागारांसह दोघेजण लाच स्वीकारताना रंगेहात जाळ्यात

एमपीसी न्यूज – वीज मीटर बाबत घेतलेल्या हरकतीवर अनुकूल अहवाल देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारताना विधी सल्लागार व सहाय्यक विधी अधिकारी (Pune News) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

विधी सल्लागार सत्यजीत विक्रम पवार (रास्ता पेठ कार्यालय) आणि सहायक विधी अधिकारी समीर रामनाथ चव्हाण (गणेशखिंड महावितरण कार्यालय) अशी या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरातील एक जमीन बांधकाम व्यावसायिकाने विकसित केली आहे. संपूर्ण बांधकाम झाल्यानंतर जागा मालक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात आर्थिक वाद झाला. बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्या नवीन इमारतींमध्ये इलेक्ट्रिक मीटर घेण्यासाठी अर्ज केला होता.

जागा मालकाने त्यातील 11 इलेक्ट्रिक मीटर्स घेण्यावर हरकत घेतली होती. कायदेशीर वाद निर्माण झाल्याने महावितरणच्या गणेशखिंड विभागातील सहायक विधी अधिकारी समीर चव्हाण यांच्याकडे हे प्रकरण पाठविण्यात आले. त्यांनी ते रास्ता पेठ कार्यालयात सत्यजीत पवार यांच्याकडे पाठविले होते.

Pune Crime News : पिस्तूलसह पाच काडतुसे बाळगणाऱ्या गुंडाला पकडले

या दोघांनी त्या हरकतीवर अनुकुल अहवाल देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडे 40 हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार आल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 18 व 19 जानेवारीला पडताळणी केली. त्यात दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयात लाचेची रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांना पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.