Pune News : पुण्यात 16 ठिकाणी होणार लसीकरण !

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांना येत्या 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू केले जाणार आहे. त्यासाठी शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत 16 ठिकाणे निश्चित केले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त  रुबल अग्रवाल यांनी दिली.

तसेच नियोजना संदर्भात पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.आशिष भारती म्हणाले, पुण्यामध्ये 16 जानेवारी रोजी लसीकरण सुरु होणार आहे.

आतापर्यंत 52 हजार रजिस्ट्रेशन झाले आहे. मुबलक प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर हे लसीकरण 8 दिवसात पूर्ण होईल. राज्य सरकारच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करुन हे लसीकरण होणार आहे. एका दिवसाला 100 लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. रजिस्ट्रेशन केलेल्या सर्वांना मेसेजद्वारे बोलवले जाईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच या 16 बुथद्वारे सरकारी व खासगी अशा दोन्ही हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. या मध्ये सरकारी 11 हजार 222 कर्मचारी असून 41 हजार 888 कर्मचारी खासगी हॉस्पिटलचे असणार आहेत. या लसीकरणासाठी जंबो हॉस्पिटलचा सध्या विचार नाही. तरी भविष्यात लसीकरणाचा आकडा वाढल्यास शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटल मध्ये लसीकरण केले जाईल, असेही डॉ.भारती यांनी सांगितले.

खालील ठिकाणी होणार लसीकरण 

पुणे परिसरात कसबा विश्रामबाग वाडा, ढोले पाटील रोड, नगर रोड, येरवडा, वारजे, सिंहगड रोड, वानवडी, कोंढवा येवलेवाडी, हडपसर, बिबवेवाडी, धनकवडी, सहकारनगर, भवानी पेठ, शिवाजी नगर, घोले रस्ता, विश्रांतवाडी, औंध बाणेर याठिकाणी लसीकरण होणार आहे. त्यासाठी येथे बूथ उभारण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.