Pune News : वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार ‘आवश्यकता प्रमाणपत्र’ !

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या प्रस्तावित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून (डीएमईआर) ‘आवश्यकता प्रमाणपत्र’ (Essentiality Certificate) प्राप्त झाले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या (MUHS) पथकाकडून पाहणी झाल्यानंतर ‘पूर्व संलग्नता प्रमाणपत्र’ (Pre Affiliation Certificate) मिळणार असल्याची आनंददायी बातमी आहे.

पुणे महापालिकेच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व अध्यापन रुग्णालय’ आहे. या महाविद्यालय स्थापनेचा महत्त्वाचा पहिला टप्पा म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयाला वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून (डीएमईआर) ‘आवश्यकता प्रमाणपत्र’ (Essentiality Certificate) मिळवणे हा आहे.

शहरात लोकसंख्येच्या गुणोत्तर प्रमाणात डॉक्टरांची संख्या, वाढत्या लोकसंख्येच्या आरोग्य सेवेचा विचार करून आवश्यक तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळाची आवश्यकता तपासून डीएमईआरकडून हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

येत्या दोन तेे तीन दिवसांमध्ये नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाच्या पथकाकडून प्रस्तावित मेडिकल कॉलेजच्या जागा, प्रयोगशाळा, वर्गखोल्या आणि रुग्णालयाची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर ‘पूर्व संलग्नता प्रमाणपत्र’ (Pre Affiliation Certificate) दिले जाणार आहे.

त्यानंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडीया (Medical Council of India)कडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रीया सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.