Pune News : थोर गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या ‘लिलावती’ ग्रंथावर वेबिनार मालिका

एमपीसी न्यूज – ‘अंकनाद’ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या ॲप कडून थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांच्या ‘लिलावती’ या ग्रंथावर वर वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.

10 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता आणि 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ही वेबिनार मालिका होणार असून त्यात गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर हे अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. वर्षभर हा उपक्रम दुसऱ्या शनिवारी, दुसऱ्या रविवारी चालणार आहे.

भारतीय गणिती वारसा पुढे आणण्याच्या उद्देशाने, आपल्या इतिहासात दडलेलं गणिती वैभव मांडणारा एक अभिनव उपक्रम म्हणून ‘अंक नाद’ ॲपने पुढाकार घेतल्याची माहिती मॅप एपिक कम्युनिकेशन्सचे संचालक मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे दिली.

आतापर्यंत अंक नादच्या माध्यमातून गणितासंबंधी विविध विषयांवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते,त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. आद्य गणिती भास्कराचार्य यांच्या लीलावती या महान ग्रंथाच्या विवेचनाच्या माध्यमातून भारताला लाभलेला बुद्धिमत्तेचा वारसा रंजक पद्धतीने उलगडला जाईल.

भास्कराचार्यांचा लीलावती हा ग्रंथ सर्वात लोकप्रिय आहे. गणित मनोरंजक करून कसे शिकवावे याचा तो एक आदर्श नमुना आहे. त्यामुळे लीलावतीने अगोदरच्या सर्व गणित ग्रंथांना मागे सारून अग्रस्थान मिळविले. पुढे सुमारे 600 वर्षे भास्कराचार्याचे लीलावती आणि बीजगणित हे ग्रंथ संपूर्ण भारतभर गणित शिकवण्यासाठीची पाठ्यपुस्तके झाली होती. या ग्रंथावर अनेक विद्वानांनी भाष्ये लिहिली, अनेक परदेशी भाषांत त्याची भाषांतरे झाली. सन 1612 साली लीलावतीचे पर्शियन भाषेत भाषांतर झाले. हेन्री थॉमस कोलब्रुक या ब्रिटिश विद्वानाने सन 1817 साली लीलावतीचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले.

लीलावतीमधील गणिते मनोरंजक करण्यासाठी भास्कराचार्यानी अनेक पशुपक्ष्यांचा उपयोग करून घेतला आहे. सर्प, मोर, वानर, भुंगे, पावसाळी मेघ, मानस सरोवर अशा अनेक गोष्टी त्यात आहेत. लीलावती ग्रंथात भास्कराचार्यानी एक परार्ध म्हणजे दहाचा सतराव्या घातापर्यंतच्या सर्व दशगुणोत्तरी संख्यांची नावे दिली आहेत. पायथागोरस सिद्धान्ताची सिद्धता केवळ चार पदांमध्ये दिली आहे. आज ज्याला डायफंटाइन इक्वेशन म्हणतात त्याला भास्कराचार्यानी कुट्टक असे नाव दिले आहे.

कुट्टक समीकरण Ax+by=c अशा प्रकारचे असते. हे समीकरण सोडवण्याची भास्कराचार्याची पद्धत अतिशय सोपी आहे. पाय या गुणोत्तराच्या सूक्ष्म व स्थूल किमती भास्कराचार्य देतात. फर्माचे इक्वेशन 1769 साली लॅग्रांजने सोडविले, पण ते इक्वेशन भास्कराचार्यानी 1150 साली सोडविले होते. पेल्सच्या इक्वेशनमधील एक्स आणि वायच्या किमती भास्कराचार्यानी चक्रवाल पद्धतीने मिळवल्या होत्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.