Pune News : सिंहगड किल्ल्यावर 30 मीटर उंचीचा भगवा ध्वज फडकणार ; 1 कोटीच्या खर्चाला ‘स्थायी’ची मंजुरी

तानाजी मालुसरे समाधीस्थळ सुशोभकरणासाठी 74 कोटी रुपये खर्चाला देखील मंजुरी

एमपीसी न्यूज : ऐतिहासिक किल्ले सिंहगडावर भव्य 30 मीटर उंचीचा भगवा ध्वज आणि विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीकडून मंगळवारी अंतिम मंजुरी देण्यात आली.

या संदर्भात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी सिंहगड किल्ल्यावर भव्य 30 मीटर उंचीचा भगवा ध्वज, विद्युत रोषणाई करण्याचा प्रस्ताव दिला. त्यासाठी 1 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

यासोबत तानाजी मालुसरे समाधीस्थळ सुशोभकरणासाठी 74 कोटी रुपये खर्चाला देखील मंजुरी देण्यात आल्याचे रासने यांनी सांगितले.

दरम्यान सिंहगड किल्ल्यावर बुरूज, ऐतिहासीक टिळक गांधी भेट झालेले विश्रामगृह आणि अन्य वस्तुरचनेची डागडुजी संवर्धन करण्याची गरज आहे. पर्यटकांसाठी स्वच्छतागृहांसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इत्यादी पायाभूत सुविधांची मागणी केली जात आहे.

परंतु, संवर्धनाऐवजी सुशोभिकरणावर भर का दिला जात आहे, असा सवाल सजग शिवप्रेमी व किल्ले संवर्धनासाठी काम करत असलेल्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

सिंहगडावर भगवा ध्वजाची उभारणीवर तज्ज्ञ काय म्हणतात…

सिंहगडावर मध्य बुरूजावर 30 मीटर भगवा ध्वजाची उभारणी शक्य

तत्पुर्वी केंद्रीय गृह मंत्रालयासह संरक्षण विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यातील वाऱ्यांचा वेग याचा हवामान तज्ज्ञांकडून अभ्यास करून अहवाल घेणे गरजेचे

जोरदार वाऱ्यामुळे जमिनीवरील झेंड्यांची दुरवस्था पाहता किल्ल्यावरील झेंड्यासाठी विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.