Pune News :  क्रीडांगणावर श्रीरामांचे शिल्प उभारण्यास राष्ट्रवादीचा विरोध 

एमपीसी न्यूज – धनकवडी-आंबेगाव पठार येथे पालिकेतर्फे दीड एकर परिसरात क्रीडांगण उभारण्यात येत आहे. या क्रीडांगणात दोन कोटी रुपये खर्चून प्रभू श्रीरामांचे भव्य शिल्प उभारण्याचा निर्णय मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीत घाईघाईने मंजूर करण्यात आला. कोणत्याही पक्षाप्रति वा धर्माप्रति व्यक्तिगत श्रद्धा असली, तरी अशा प्रकारे क्रीडांगणावर श्रीरामांचे शिल्प उभारण्याच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. 

शैक्षणिक, ऐतिहासिक आणि फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर आधारलेल्या सांस्कृतिक पुण्यनगरीला धार्मिकतेची झालर देण्याचा जो प्रयत्न महापालिकेतील सत्ताधारी भाजपतर्फे होत आहे, त्याचा राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निषेध केला.

धनकवडी- आंबेगाव पठार (प्रभाग ३९) येथे महापालिकेच्या वतीने दीड एकर परिसरात क्रीडांगण उभारण्यात आले आहे. सध्या ऑलिम्पिकची चर्चा होत असताना आपल्या देशात क्रीडांगणाची कमतरता असल्याचाही मुद्दा चर्चेत येत आहे. या क्रीडांगणातून निश्चितच जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतील, असा आम्हाला विश्वास आहे. परंतु, या क्रीडांगणाच्या जागेत श्रीरामांचे शिल्प उभारण्याचा निर्णय खेदाचा आहे.

या प्रभागातील नगरसेविका  वर्षा तापकीर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीतून स्थायी समितीत हा ठराव मांडला होता. अन् त्यास कोणताही विचार न करता स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना आणि बजेटची कमतरता असतानाही इतर कामांमधून दोन कोटी रुपये काढण्याची भाजपची ही कृती निषेधार्ह, असे जगताप म्हणाले.

आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या पक्षाशी वा विचारसरणीशी जोडलो गेलो आहोत. प्रभू श्रीरामही प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहेत. माझीही प्रभू श्रीरामांवर श्रद्धा आहे. मात्र, आम्ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराचे पाईक आणि छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि हीच पुण्याची संस्कृती आहे. त्यामुळे, जेव्हा धर्म व आपली श्रद्धा इतरांवर थोपविण्याचा जो प्रयत्न होत आहे, त्यास आमचा विरोध आहे. क्रीडांगण हे खेळासाठी, सरावासाठीच असायला हवे. या ठिकाणी शिल्प उभारल्यास त्याचा उत्सवासाठी वा धार्मिक विधीसाठीच अधिक वापर होण्याची शक्यता सध्यातरी भाजपच्या या कृतीवरून दिसून येत आहे.

गेल्या साडेचार वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपला कोणतीही ठोस अशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे, ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून केंद्रापासून पालिकेपर्यंत जे हत्यार वापरण्यात येते, ते धर्माचे हत्यार वापरण्याचा आणि त्यातून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, सूज्ञ पुणेकर भाजपच्या या छुप्या अजेंड्याला अजिबात खतपाणी घालणार नाहीत आणि आम्ही हा प्रयत्न निश्चितच हाणून पडणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

ऐतिहासिक अशा  पालिकेचे प्रतिनिधित्व थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी केले आहे. त्यांच्या विचारावर आजवर सुरू असलेली ही वाटचाल भाजपच्या असल्या प्रयत्नांनी निश्चितच खंडित होणारी नाही. साडेचार वर्षांपूर्वीपर्यंत महापालिकेने विकासाच्या आधारावर शहराची ओळख निर्माण केली होती. गेल्या साडेचार वर्षांत ती खंडित झाली असून, त्याला पुन्हा पूर्वपदावर आणण्याची गरज आहे. आज क्रीडांगण, उद्यानांची शहरात गरज आहे. या ठिकाणी उत्साहाचा अतिरेक आणि धर्मांधता निश्चितपणे धोकादायक आहे. हा धोका सूज्ञ पुणेकर निश्चितच ओळखून आहेत. त्यामुळे, भाजपने क्रीडांगणात राजकीय-धार्मिक खेळांचे आयोजन करू नये, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

 

नियमबाह्य मंजुरी कशी?

कोणतीही महापालिका ही कायद्यानुसार चालते. राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत महापालिकेला जे विकास नियंत्रण नियमावली प्राप्त झाली आहे, त्यानुसार कोणत्याही क्रीडांगणात मंदिर, शिल्प, पुतळा उभारण्यास परवानगी नाही. असे असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजप आपली हिंदुत्ववादी भूमिका अधोरेखित करण्यासाठी या नियमांची पायमल्ली करत आहे. या नियमबाह्य कृतीबाबत आम्ही राज्य सरकारकडे तक्रार करणार आहोत. श्रीरामांबद्दलच्या श्रद्धेतून कोणत्याही क्रीडांगणावर घाला घालण्याचे काम भाजपने करू नये.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.