Pune : अरे बाप रे… मटण 700, चिकन 250 ते 300 रुपये किलो !

एमपीसी न्यूज – चिकन आणि मटनामुळे कोरोना होत असल्याचे चुकीचे मेसेज व्हायरल झाले होते. त्यामुळे या उद्योगाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. सध्या भाजीपाला मिळणे अवघड झाल्याने पुणेकरांनी चिकन – मटनावर ताव मारायला सुरुवात केली आहे. मात्र, मटण 700 रुपये तर चिकन 250 ते 300 रुपये किलो दराने विकले जात आहे.

दुसरीकडे गणेश पेठ मासळी बाजार बंद आहे. पुण्यात रत्नागिरी, गुजरात आणि नदीच्या मासळीच्या अत्यल्प आवक होत आहे. त्यामुळे पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने मासळीच्या दरातही दुप्पट वाढ झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.

कोरोनाचा फटका अन्य व्यावसायिकांप्रमाणे शहरातील मटण – चिकन – मासळी विक्रेत्यांनाही बसला आहे. 70  टक्के व्यवसाय गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहेत. लॉकडाउनच्या सुरुवातीला काही प्रमाणात मटण विक्री सुरू होती. काही विक्रेत्यांनी 800 ते 1000 रुपये दराने मटणाची विक्री केली. त्याचा सध्या बाजार बंद आहे.

कोंढवा, हडपसर भागात 30  टक्के दुकाने सुरू आहेत. मटण विक्री बंद पडल्याने कामगार, वाहनांवरील चालक, क्लिनर यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या 700 रुपये किलो दराने मटणाची विक्री सुरू आहे, अशी माहिती पुणे शहर मटण विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली. तर, सध्या माल उपलब्ध होत नसल्याने चढ्या दराने विक्री सुरू असल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.