Pune : व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पूना मर्चंट्स चेंबर्स व व्यापारी महासंघाचे शरद पवारांना साकडे

Poona Merchants Chambers and Traders Federation Sharad Pawar to solve the problems of traders

एमपीसी न्यूज – पूना मर्चंट्स चेंबर्स आणि पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने आज (शुक्रवारी) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सध्या सर्वच व्यापारी अडचणीत आहेत. त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून विविध सवलती मिळवून देण्याची मागणी शिष्टमंडळाने श्री पवार यांच्याकडे केली.

याप्रसंगी पूना मर्चंट्स चेंबर्सचे माजी अध्यक्ष वालचंद संचेती आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका उपस्थित होते. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापारी व दुकानदारांच्या अडचणी संदर्भातील निवेदन यावेळी शरद पवार यांच्याकडे देण्यात आले.

पुणे व्यापारी महासंघात 82 संघटना अंतर्भूत असून पुणे शहरातील 25 हजारांहून अधिक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. महासंघाच्या प्रतिनिधींनी व्यापाऱ्यांच्या विविध अडचणींची माहिती देऊन याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

घाऊक बाजारपेठेसाठी पुणे शहरात शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विक्री प्रदशर्नांचे पुण्यात आयोजन करण्यासाठीही सरकारने स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी.

लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करावे तसेच 100 हून अधिक कर्मचारी काम करत असलेल्या संघटनांनाही केंद्र सरकारने पीएफची सुविधा द्यावी. छोट्या व्यापऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी. व्यापऱ्यांना निवृत्तीनंतर लाभदायी ठरेल, अशी आयुष्मान भारतसारखी योजना केंद्राने सुरू करावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

किरकोळ आणि घाऊक बाजारातील समस्या अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी तसेच काही नवीन योजना बनवताना सरकारी समितीत पुणे व्यापारी महासंघाच्या किमान एका सदस्याचा समावेश असावा, अशी विनंतीही शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.

पुणे व्यापारी महासंघाच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेऊन, सरकारपर्यंत या समस्या पोहचवून त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन खासदार शरद पवार यांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.