Pune : कडेवर मूल असेल तर लोक भीक जास्त देतात म्हणून तिने चार महिन्यांच्या बाळाला पळवले

लोहमार्ग पोलिसांनी पाच दिवसात मूल शोधून पळवून नेणा-या महिलेला ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – चार महिन्यांचे मूल पळवून नेणा-या महिलेला मुंबई पोलिसांच्या मदतीने पुणे लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मूल चोरीची घटना शुक्रवारी (दि. 17) रात्री सव्वाआठ ते बाराच्या सुमारास फलाट क्रमांक दोनवर बुक स्टॉलजवळ घडला. अटक करण्यात आलेल्या महिलेने हे मूल भीक मागण्यासाठी चोरले असून कडेवर लहान मूल असेल तर लोक जास्त भीक देतात, म्हणून मूल चोरले असल्याची अनोखी कबुली दिली आहे.

मनीषा काळे (वय 25, रा. हडपसर रेल्वे स्टेशन जवळील झोपडपट्टी, मूळ रा. मु. पो. भुतकर वाडी, भिंगार देवमळा, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या भिकारी महिलेचे नाव आहे. संगीता आनंद कंक (वय 25, रा. कोपर्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास संगीता त्यांच्या चार महिन्यांच्या मुलाला घेऊन गावी जात होत्या. रेल्वेसाठी उशीर असल्याने त्या फलाट क्रमांक दोनवर असलेल्या बुक स्टॉलवर झोपी गेल्या. त्यावेळी त्यांचे चार महिन्यांचे मूल जागे होते. मनीषा काळे ही भीक मागते. तिने संगीता झोपल्या असून त्यांचे लहान मूल त्यांच्याजवळ खेळत असल्याचा फायदा घेत ती मुलाला घेऊन पसार झाली. संगीता यांना जाग आल्यानंतर त्यांचे तान्हे मूल त्यांच्याजवळ नव्हते. त्यामुळे त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली.

लोहमार्ग पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने पुणे शहरातील दत्त मंदिर, दगडूशेट गणपती मंदिर, तांबडी जोगेश्वरी मंदिर, महात्मा फुले भाजी मंडई, दर्गा परिसरात भीक मागणा-या लोकांकडे तसेच परिसरात कसून चौकशी केली. त्यानंतर मुंबई येथील जोगेश्वरी मधील एका पुलाखाली एक संशयित महिला भीक मागत आहे. तिला ओशिवरा पोलीस आणि मुंबई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने तिच्याबद्दल माहिती दिली, मात्र तिच्याजवळ असलेल्या मुलाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

दरम्यान, पुणे लोहमार्ग पोलिसांनी संगीता यांच्यासह एक पथक ओशिवरा पोलीस ठाण्याकडे पाठवले. संगीता यांनी मुलाची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी मूल चोरणा-या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी तिने कडेवर लहान मूल असेल तर लोक जास्त भीक देतात, म्हणून मूल चोरले असल्याचे कबूल केले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल दबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, पोलीस कर्मचारी धनंजय दुगाने, सुनील कदम, श्रीकांत भोसले, आनंद कांबळे, अमरदीप साळुंके, अनिल दांगट, दिनेश बोरनारे, जनार्दन गर्जे, विक्रम मधे, स्वप्नील कुंजीर, निलेश बिडकर, राजेश कोकाटे, प्रभा बनसोडे, अश्विनी येवले, मनीषा बेरड, चालक सुधाकर जगताप, ओशिवरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार रणजित कुरील, महिला पोलीस शिपाई स्वरा साळकर, पोलीस हवालदार शिर्के, महिला पोलीस कॉन्स्टेबल पुरी, आंबोली पोलीस ठाणे मुंबई यांच्या पथकाने केली.

Attachments area

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.