Pune: पुणे व्यापारी महासंघाच्या कोरोना चाचणी शिबिरात 32 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज – पुणे व्यापारी महासंघ व पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने महासंघाचे सदस्य व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित  कोविड अँटिजेन चाचणी शिबिरात चार दिवसांमध्ये 1,214 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात 32 कर्मचाऱ्यांच्या चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. विशेष म्हणजे सर्व व्यापाऱ्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे.

पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व सचिव महेंद्र पितलिया यांनी ही माहिती दिली. शिबिराच्या पहिल्या दिवशी 250 चाचण्या झाल्या. त्यात चार कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. दुसऱ्या दिवशी 346 जणांच्या चाचण्या झाल्या. त्यात 13 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. तिसऱ्या दिवशी 350 चाचण्या झाल्या. त्यात 10 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. चौथ्या दिवशी 298 चाचण्या झाल्या. त्यात पाच कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. झालेल्या चाचण्यांपैकी पॉझिटीव्ह रिपोर्ट आलेल्या चाचण्यांचे प्रमाण 2.57 टक्के आहे.

पहिले दोन दिवस लक्ष्मी रोडवरील दिनेश सांकला यांच्या सभागृहात हे शिबिर झाले. त्यानंतर बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालयात शिबिर झाले.  शिक्षण प्रसारक मंडळाचे अ‍ॅड. श्री. के. जैन, अशोक वाझे आणि  प्राचार्या ओमासे यांनी कोविड चाचणीसाठी हॉल, वर्ग खोल्या व लॉबी उपलब्ध करून देऊन विशेष सहकार्य केले. या शिबिरावरून आम्ही व्यापारी स्वतःची आणि कर्मचाऱ्यांचीही चांगली काळजी घेत असल्याचे सिद्ध होते, असे रांका यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.