Pune News : सरदार भगतसिंग यांचे मूळ छायाचित्र पाहण्याची पुणेकरांना संधी

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त इतिहास प्रेमी मंडळ आणि सेव्ह हेरीटेज यांच्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 23) सायंकाळी साडेसहा वाजता बाजीराव रस्त्यावरील नू. म. वि हायस्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

भगतसिंग यांच्या आईने इन्कलाब कादंबरीच्या लेखिका मृणालिनी जोशी यांना भेट दिलेल्या भगतसिंग यांच्या मूळ छायाचित्राचे पूजन त्यांच्या 91 व्या या स्मृतिदिनी करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी दिली.

ब्रिटीशांनी 23 मार्च 1931 रोजी सायंकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या तीन महान देशभक्तांना फाशी दिले होते. त्यामुळे बुधवारी 7 वाजून 33 मिनिटांनी राष्ट्रगीत गाऊन क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी सरदार भगतसिंग यांचे मूळ छायाचित्र पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

कार्यक्रमांतर्गत इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचे कथाकथन देखील होणार आहे. त्यापूर्वी सायंकाळी 6 वाजता फरासखाना पोलिस चौकीसमोर क्रांतिकारक कट्टा येथील हुतात्मा स्मारकास मानवंदना देण्यात येणार आहे. तरी पुणेकरांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.