Pune: होलसेल विक्रेत्याची तीन कोटींची फसवणूक करुन किरकोळ विक्रेता पसार

Pune: Retailer cheating Wholesalers for Rs 3 crore आरोपींनी फिर्यादीच्या दुकानातून वेळोवेळी तीन कोटी 15 लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रिक वस्तू घेतल्या. त्याबदल्यात फिर्यादीला बँकेचा चेक दिला परंतु, हा चेक न वटल्यामुळे बँकेतून परत आला.

एमपीसी न्यूज- इलेक्ट्रिक वस्तूंची होलसेल भावात विक्री करणाऱ्या दुकानदाराला तब्बल 3 कोटी 15 लाखांचा चुना लावून किरकोळ विक्रेते व्यावसायिक पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्रल्हाद लक्ष्मण हरियाणी (वय 38) आणि सुनील श्रीचंद हरियाणी (वय 50) अशी पसार झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी शशिकांत रामस्वरूप चमारिया (वय 42) यांनी फिर्याद दिली असून चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चमारिया यांचे मुंढवा परिसरात इलेक्ट्रिक वस्तूंची विक्री करणारे होलसेल दुकान आहे. तर आरोपींचे बुधवार पेठेत इलेक्ट्रिकलचे दुकान होते.

आरोपींनी फिर्यादीच्या दुकानातून वेळोवेळी तीन कोटी 15 लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रिक वस्तू घेतल्या. त्याबदल्यात फिर्यादीला बँकेचा चेक दिला परंतु, हा चेक न वटल्यामुळे बँकेतून परत आला.

चेक परत आल्यामुळे फिर्यादीने आरोपींशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु संपर्क झाला नाही. त्यामुळे शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चमारिया यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ते कुटुंबासह पसार झाल्याचे लक्षात आले. न्यायालयातून त्यांच्या नावाचे वॉरंट सुद्धा काढण्यात आले आहे.

अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. या आरोपींविषयी माहिती देणाऱ्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल आणि त्यांचे नावही गुप्त ठेवण्यात येईल अशी घोषणाही पोलिसांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.