Pune: सफाईसेवक महादेव जाधव स्वच्छतेचे ‘ब्रँड अम्बॅसिडर’

एमपीसी न्यूज – कचरा समस्या सोडविण्यासाठी पुणेकरांचे प्रबोधन करणाऱ्या पुणे महापालिका सेवक महादेव जाधव यांची सोमवारी ‘स्वच्छ  सर्वेक्षण २०२०’ साठीचे ‘ब्रँड अम्बॅसिडर’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी सभागृहनेते व नगरसेवक श्रीनाथ भिमाले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक उपस्थित होते.

शहराला दैनंदिन स्वरूपात स्वच्छ ठेवण्यासाठी शहराचे सर्वच ‘रियल हिरो’ म्हणजेच सफाई सेवक हे रोज आपले काम प्रामाणिकपणे करीत असतात. रस्त्यावर झाडू मारणे, कचऱ्याने भरून वाहणारे कंटेनर आवरणे, ड्रेनेज साफ करणे, अशी कितीतरी घाणीची कामे सफाई सेवक करतात. महादेव जाधव गेली अनेक वर्षे हे काम आनंदाने गाणी म्हणत म्हणत करीत आहेत. पुणे मनपाचा हा ‘रियल हिरो’ गेली अनेक वर्षे आपले दैनंदिन काम करताना शाहिरी, गाणी म्हणत नागरिकांचे प्रबोधन करीत आहे.

नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करावे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता तो महानगरपालिकेच्या यंत्रणेस द्यावा, प्लास्टिकचा वापर करू नये, अशा अनेक विषयांवर महादेव जाधव विविध प्रकारची रोचक गीते तयार करून त्यातून नागरिकांचे प्रबोधन करीत आहेत. तसेच मानवनिर्मित कचऱ्याची समस्या, कचरा निर्मूलन प्रक्रिया व त्यात येणाऱ्या अडचणी व या अडचणींना जीव आरोग्य जोखमीत टाकून तोंड देणारा सफाई सेवक या घटकावर आधारित लक्षुमी या माहितीपटात त्यांनी काम केले आहे. या माहितीपटास यावर्षीच्या आण्णाभाऊ साठे राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. महादेव जाधव हे कचऱ्याबाबतची प्रत्येक समस्या व ती कशामुळे होते व ती नष्ट करण्यासाठी नागरिकांनी काय केले पाहिजे, याबाबत नागरिकांचे सातत्याने प्रबोधन करीत आहेत.

महादेव जाधव हे २००० सालापासून पुणे मनपामध्ये सफाई सेवक म्हणून काम करीत असून या २० वर्षाच्या सेवेत आपले दैनंदिन स्वच्छतेचे करीत असतानाच गाणी गाऊन ते नागरिकांचे प्रबोधन करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.