Pune : ससाणेनगर येथे टँकरच्या धडकेने रेल्वे फाटक तुटले ; वर्दळीच्या वेळी नागरिकांची गैरसोय

एमपीसी न्यूज- ससाणेनगर – सय्यदनगर येथे असलेले रेल्वे फाटक आज सकाळी साडेसातच्या सुमारास पाण्याचा टँकर धडकून तुटले. सकाळची वर्दळीची वेळ असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे, शिवसेना प्रभाग प्रमुख शिवा शेवाळे व त्यांच्या मित्रपरिवाराने तातडीने धाव घेत वाहतुकीला अडथळा करणारे फाटक मोठ्या शर्थीने बाजूला करून रास्ता मोकळा केला. हे फाटक एका वर्षामध्ये चार वेळा तुटून पडले. सुदैवाने आजपर्यंत यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

दरम्यान, फार मोठा गाजावाजा करुन 40 लाख रुपये चुकिच्या पध्दतीने खर्च करून आमदार योगेश टिळेकर यांनी जनतेची लूट केली आहे असा आरोप ससाणे यांनी केला आहे. रेल्वे फाटक तुटण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे सदर प्रकरणी संबंधित ठेकेदार, रेल्वे अधिकारी व स्थानिक आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक योगेश ससाणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.