Pune : हडपसर परिसरात राहणाऱ्या दोन कुटुंबातील सातजण बेपत्ता

एमपीसी न्यूज- पुण्याच्या हडपसर परिसरात राहणाऱ्या दोन कुटुंबातील सात जण बेपत्ता असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही कुटुंबातील सात सदस्य पुण्यातील पानशेत धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. बुधवार सकाळपासून त्यातील पाच जणांचे फोन बंद लागत आहेत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सिध्दार्थ उर्फ हरीष सदाशिव मगर (वय 38), सौ स्नेहल उर्फ ईश्वरी हरीश मगर, त्यांच्या पाच वर्षाच्या जुळ्या मुली – आरंभी आणि सायली, जगन्नाथ हरी सातव, त्यांची पत्नी आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा असे सातजण बेपत्ता आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, मगर आणि सातव कुटुंबीय पुण्यातील पानशेत धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. मंगळवारी ते खडकवासला येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. परंतु बुधवार सकाळपासून त्यातील पाच जणांचे फोन बंद असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस तपास करीत आहेत. दोन्ही कुटुंब प्रमुख हे जमीन खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करतात अशी माहिती पुढे आली आहे.

मगर  कुटुंबीय

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.