Pune Suicide News: संगणक अभियंता तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

एमपीसीन्यूज : संगणक अभियंता तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बीएमसीसी रस्ता परिसरातील एका सोसायटीत हा प्रकार घडला.

अक्षय देवधर (वय 36) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षयच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नसले तरी मानसिक तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

अक्षय देवकर हा जर्मनी स्थित एका नामांकित कंपनीमध्ये संगणक अभियंता होता. तसेच त्याला गिर्यारोहणाची देखील प्रचंड आवड होती. अक्षय मूळचा मुंबईचा. इंग्लंड येथून आपले शिक्षण पूर्ण केले होते. तेथेच तो नोकरी देखील करायचा.

काही दिवसांपूर्वी तो पुणे शहरात आला होता. त्याचे आई वडील मुंबईत राहतात. डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका इमारतीत त्याच्या आजोबांची सदनिका होती. या सदनिकेत तो एकटाच राहत होता.

दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास अक्षय फोन उचलत नसल्यामुळे त्याचे नातेवाईकांनी फ्लॅटवर येऊन पाहणी केली असता फ्लॅट आतून बंद होता. बराच वेळ बेल वाजवूनही दरवाजा उघडत नसल्यामुळे नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर फ्लॅट परिसरात दाखल झालेल्या पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना अक्षय गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

पोलिसांनी त्याला तातडीने खाली उतरून ससून रुग्णालयात दाखल केले. तपासणी केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. डेक्कन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.