BNR-HDR-TOP-Mobile

Pune : अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणा-या तीन पोलीस कर्मचा-यांचे तडकाफडकी निलंबन

एमपीसी न्यूज – पुणे ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलीस हवालदारांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असताना जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी बुधवारी (दि. 13) ही कारवाई केली आहे.

रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमीरुद्दीन रफीउद्दीन चमनशेख, लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार डी. सी. बेंद्रे आणि पोलीस हवालदार डी. एन. गायकवाड अशी निलंबित केलेल्या पोलीस कर्मचा-यांची नावे आहेत.

  • रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रांजणगाव येथील आयसीआयसीआय बँकेसमोर पुणे-नगर महामार्गावर एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या तीनपत्ती जुगार खेळणा-या सात जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 30 हजार 670 रुपयांचा जुगाराचा ऐवज जप्त करण्यात आला. याबाबतची माहिती पोलीस हवालदार अमीरुद्दीन रफीउद्दीन चमनशेख यांना होती. तरीही त्यांनी जाणीवपूर्वक त्याबाबत कारवाई केली नाही.

तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाघोली गावच्या हद्दीत खांदवेनगर येथील रॉयल पार्क लॉजच्या शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये चालणा-या कल्याण मटक्यावर छापा टाकला. त्यात सहा जणांविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करत 13 हजार 810 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले. याबाबतची माहिती पोलीस हवालदार डी. सी. बेंद्रे आणि पोलीस हवालदार डी. एन. गायकवाड यांना होती.

  • वरील अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना असूनही त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याबाबत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तिन्ही पोलीस कर्माचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई करत पोलीस दलातून निलंबित केले आहे. तसेच त्यांचे खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणा-या पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांवर यापुढे अशा प्रकारची शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3