Pune:शून्य विद्युत अपघाताच्या ध्येयाने उपाययोजना करा – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

एमपीसी न्यूज – जाणता अजाणता झालेल्या चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे वीजयंत्रणेच्या (Pune)संपर्कातून क्षणार्धात होत्याचे नव्हते होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणची वीजयंत्रणा असेल किंवा ज्या-ज्या यंत्रात, उपकरणांत वीजप्रवाह आहे ते हाताळताना किंवा त्यापासून प्रत्येकाने योग्य खबरदारी घ्यावी. सतर्क राहून कोणताही धोका पत्करू नये असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले.
तसेच पुणे परिमंडलामध्ये शून्य विद्युत अपघाताच्या ध्येयाने वीजसुरक्षेच्या उपाययोजनांसोबतच नागरिकांमध्ये वीजसुरक्षेचा जागर सुरु ठेवावा असे निर्देश त्यांनी दिले.
 पुणे परिमंडलामध्ये विद्युत सुरक्षा अभियानानिमित्त मंगळवारी पत्रकार भवनामध्ये पर्वती विभागाकडून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य अभियंता पवार बोलत होते. अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, कार्यकारी अभियंता मनीष सूर्यवंशी, भागवत थेटे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले, डिसेंबर 2022 पासून पुणे परिमंडलामध्ये सातत्याने वीजसुरक्षेचा जागर सुरु आहे. शाळा, महाविद्यालये, गर्दीच्या ठिकाणी प्रबोधन करण्यात येत आहे. यात कार्यकारी अभियंता मनीष सूर्यवंशी आणि सुरक्षा अधिकारी उमेश करपे यांच्यासह पर्वती विभाग चांगली कामगिरी बजावत आहे.
कार्यशाळेत उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी (Pune)यांनी वीजसुरक्षेसाठी तांत्रिक व मानवी चुका टाळण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वीजसुरक्षेची शपथ घेण्यात आली.
पर्वती विभागाकडून पुणे महानगरपालिकेच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी वीजसुरक्षेबाबत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्य अभियंता पवार व पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आले. यामध्ये वीजसुरक्षेवर आधारित चित्रकला, निबंध लेखन, सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेते सोहम शंकर पाचकुडवे, प्रणाली सागर लगस, तनुजा शाळिकराम गटकळ, (इयत्ता पाचवी), पायल गणेश ओव्हाळ, श्रेया शंकर पाचकुडवे, गौरी सचिन अडागळे, मानव माधव गोलांबडे, (इयत्ता सहावी), दत्ता बसुराज चलवादी व आदर्श सागर लगस (इयत्ता सातवी) या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. उमेश करपे यांनी केले. या कार्यक्रमाला पर्वती विभागातील अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.