Pune : स्वतंत्र खलिस्तान निर्मितीच्या पुरस्कर्त्या दहशतवाद्याला एटीएस कडून अटक

एमपीसी न्यूज – दहशतवादी कारवाया करण्यासाठी तरुणांना भडकवणे तसेच त्यांना शस्त्रास्त्रे पुरविणा-या आणि स्वतंत्र खलिस्तान निर्मितीच्या पुरस्कार्त्याला चाकण मधून अटक करण्यात आली. ही कारवाई पुणे युनिटच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केली.

अटक करण्यात आलेला आरोपी 42 वर्षाचा असून तो बेल्लारी कर्नाटक येथे ओळख लपवून राहत होता. तो मूळचा पंजाब मधील रोपर येथील आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथक, पोलीस ठाणे मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटला माहिती मिळाली की, एक इसम चाकण येथे येणार असून त्याच्याकडे हत्यार आहे. त्यामुळे पोलिसांनी चाकण येथे सापळा रचून त्याला अटक केली. त्याची अंगझडती घेतली आता आरोपीजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण 41 हजार 950 रुपयांचा ऐवज मिळाला.

आरोपी अत्यंत सफाईदारपणे इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर करीत आहे. त्या माध्यमातून तो शस्त्रास्त्र जमविणे तसेच भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी तरुणांना भडकवण्याचे काम करीत आहे. तो स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता आहे. त्यासाठी तो देशांतर्गत व पाकिस्तानसह विदेशातील दहशतवादी विचारसरणी असलेल्या लोकांच्या संपर्कात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांना सोबत घेऊन भारतात दहशतवादी कारवाया करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्याने शस्त्रास्त्रे जमा देखील केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या अन्य एका साथीदाराला पंजाब मधील सरहद पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडेही तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.