Pune : काळाची पाऊले अन् विदयार्थी हित पाहूनच अभ्यासक्रमाची मांडणी हवी -डॉ. स्नेहा जोशी

एमपीसी न्यूज – नव्या युगातील बदलत्या प्रवाहाकडे लक्ष देऊन विदयार्थी हिताची रचना तयार करत अभ्यासक्रमाची मांडणी केली जाते, असे प्रतिपादन अभ्यास मंडळाच्या सदस्या डॉ. स्नेहा जोशी यांनी आज येथे केले.

मराठी अध्यापक संघ, पुणे आयोजित मराठी भाषा राज्यस्तरीय चिंतन शिबिरामध्ये ‘मुक्तसंवाद’ या सत्रामध्ये त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील द्वारकानाथ जोशी होते. शिबिराच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये इयत्ता नववी व दहावी अभ्यासक्रम, कृतिपत्रिका आराखडा व मूल्यमापन या मुक्तसंवाद चर्चेमध्ये डॉ. जोशी यांनी आपले विचार मांडले. ‘कृतीपत्रिकेचा आत्मा हा आकलन, स्वमत, रसास्वाद व व्यक्तिमत्व या चार शब्दांमध्ये दडला आहे.

दरदहा वर्षानी संक्रमण होत असल्याने प्रश्नपत्रिकेतून कृतीपत्रिकेकडे त्याची मांडणी व स्वरूप ठरविण्यात येते. सृजनशील विचार, चिकित्सक विचार, तार्किक विचार आणि जीवनानुभव हे चारस्तंभ कृतीपत्रिकेचा आराखडा व मूल्यमापन करताना विचारात घेतले जातात, असे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात द्वारकानाथ जोशी यांनी, पाठयपुस्तकाचा आणि मूल्यमापनाचा गोंधळ उडाला असल्याची बाब स्पष्ट करीत आकलन व अभिव्यक्तीचे भांडार मांडण्याची गरज असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अशोक तकटे, ज्ञानदेव दहिफळे, नाना शिवले, संतोष काळे, विष्णु मुंजाळे, सोमनाथ भंडारे, नवनाथ तोत्रे, कैलास घेनंद, सुरेश लोखंडे, भास्कर पानसरे, स्मिता ओव्हाळ, दिपाली नागवडे, रूपाली ढमढेरे, सोनाली कातोरे, हेमा नवले, संजय गवांदे यांनी परिक्षण घेतले.

ज्ञानोबा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले अभिमन्यू ताकवले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विक्रम कदम यांनी सूत्रसंचालन केले तर यशवंत बेंद्रे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.