Pune News : आरोग्याच्या निष्काळजीपणामुळे कोरोनापेक्षा गंभीर आजार येतील – ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डाॅ. अविनाश भोंडवे

श्री सद्गुरु जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवात 'कोरोनाने आपल्याला काय धडा दिला' या विषयावर व्याख्यान

एमपीसी न्यूज – चांगले आरोग्य ही माणसाची प्राथमिक गरज आहे. परंतु आजही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आरोग्याच्या सूचना आणि प्रतिबंधात्मक उपाय याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच कोरोना अधिक पसरला. अशा प्रकारचा निष्काळजीपणा कायम राहिला तर यापेक्षा अधिक गंभीर साथीच्या रोगांना जगाला सामोरे जावे लागेल अशी भीती ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केली.

श्री सद्गुरु जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे श्री सद्गुरु जंगली महाराज यांच्या 132 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात ‘कोरोनाने आपल्याला काय धडा दिला’ या विषयावर डॉ. अविनाश भोंडवे बोलत होते. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे.

डॉ अविनाश भोंडवे म्हणाले, कोरोनाने जगाला अनेक वैद्यकीय ,सामाजिक, आर्थिक धडे दिले. त्यातून माणसाने योग्य वेळी शिकले पाहिजे. स्वच्छता ठेवणे, मास्क घालणे, गर्दी टाळणे अशाप्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाय केवळ कोरोना पासून बचाव करण्यासाठी नव्हे तर माणसाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी गरजेचे आहे. परंतु आता कोरोना कमी होत असताना कोणीही प्रतिबंधात्मक उपाय आणि सूचना याकडे गांभीर्याने पाहत नाही याचा परिणाम म्हणून कोरोनापेक्षा अधिक मोठ्या आजारांना आपण एक प्रकारे निमंत्रणच देत आहोत.

माणसाने आपल्या आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहिले पाहिजे, मानसिक दृष्ट्या खंबीर राहिले पाहिजे असे धडे कोरोनाने आपल्याला दिले .यामधून आपण वेळीच बोध घेतला नाही तर आपण पुन्हा कोरोना पेक्षा पेक्षा मोठा आणि गंभीर आजारांना तोंड देण्यासाठी तयार रहावे, अशी सूचनाही डॉ अविनाश भोंडवे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.