Pune : रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त ‘रिपाइं’तर्फे ‘फाईट अगेन्स्ट कॅन्सर’ अभियान

एमपीसी न्यूज – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘रिपाइं’च्या वतीने ‘फाईट अगेन्स्ट कॅन्सर’ अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत कर्करोगाबाबत जागृती करण्यासह गुटखाविरोधी मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव व राष्ट्रीय निमंत्रक अ‍ॅड. मंदार जोशी यांनी दिली.

पुण्यातील एका कार्यक्रमात रामदास आठवले यांच्या हस्ते या अभियानाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी ‘रिपाइं’चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरोदे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अयुब शेख शहर सचिव महिपाल वाघमारे, प्रसिद्धी प्रमुख शाम सदाफुले, ‘रिपाइं’ विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष रमेश मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेब जानराव म्हणाले, “कर्करोगासारख्या आजाराचा सामना करण्याऱ्या रुग्णांना पक्षाच्या वतीने मदतीचा हात दिला जाणार आहे. सवलतीच्या दरात उपचार, तपासण्या, केमोथेरपीसारख्या शस्त्रक्रिया करण्यात मार्गदर्शन व साहाय्य पुरविले जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांना सर्वतोपरी मदत पुरवण्यात येणार असून, कर्करोगाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जाणार आहेत.”

अ‍ॅड.मंदार जोशी म्हणाले, “गुटखा-तंबाखू यासारख्या व्यसनामुळे कर्करोगाला आमंत्रण मिळत आहे. शहरातील गुटखा व्यापाऱ्यांविरोधात मोकाअंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी आहे. गुटखा आणि तंबाखु विक्री करणाऱ्यांच्या, तसेच रुग्णांना मदत पुरविण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांच्या विरोधात धडक आंदोलन केले जाणार आहे. गुटखाबंदीच्या अंमलबजावणीसाठी जानेवारीमध्ये आंदोलन केले जाणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.