Pune : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा 3 हजारांहून अधिक

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 3 हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने रुग्ण आढळून येत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. आज (मंगळवारी) दुपारी 4 पर्यंत तब्बल 136 कोरोनाचे रुग्ण आढळले.

पुणे शहरात कोरोनाचे 2700 रुग्ण आहेत. तर, जिल्ह्यात 3105 रुग्ण आहेत. आतापर्यंत 161 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सुदैवाने सोमवारी रात्रीपासून आतापर्यंत एकही कोरोनाचा बळी गेला नाही. कोरोनाच्या टेस्ट मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

शहरातील भवानी पेठ, येरवडा, ढोले-पाटील रस्ता, शिवाजीनगर-घोले रस्ता आणि कसबा-विश्रामबागवाडा या सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळणाऱ्या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत आतापर्यंत एक लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यातील दोनशे कोरोनाग्रस्त रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार सुरू करण्यात आले आहेत.

या पाच क्षेत्रीय कार्यालयांची हद्द कोरोनामुक्त करण्याची घोषणा महापालिकेने केली असून, त्यादृष्टीने या सर्व भागांत तपासणी आणखी वेगाने वाढविण्यात आली आहे. या भागांत 100 टक्के लॉकडाऊन अंमलबजावणी करण्यासाठी सर्वच दुकाने बंद करण्याचा निर्णय महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे.

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या भवानी पेठेत511,  ढोले पाटील रोड 409,  शिवाजीनगर-घोले रोड 326,  कसबा-विश्रामबाग 319, येरवडा-कळस-धानोरी भागांत कोरोनाचे 294 रुग्ण आहेत. भवानी पेठेत आतापर्यंत कोरोनामुळे 38 मृत्यू झाले असून, रुग्णसंख्या 500च्या पार गेली आहे. तर, उपचार घेऊन बरे झालेल्या नागरिकांची संख्याही मोठी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.