Pune: रुग्णाला हाॅस्पिटलने अचानक काढले बाहेर, दुसरे हॉस्पिटल न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू

गॅलक्सी रुग्णालयाच्या मनमानीमुळे  वडगाव मावळ येथील दत्तात्रय भिकू ढोरे यांनी गमावले प्राण गमावल्याचा नातेवाईकांचा आरोप

एमपीसी न्यूज – पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉस्पिटलने एका रुग्णाला अचानक बाहेर काढले, रुग्ण आणि नातेवाईक दिवसभर दुसऱ्या हाॅस्पिटलच्या शोधात वणवण फिरले, मात्र हाॅस्पिटल न मिळाल्याने अखेर रुग्णाचा मृत्यू झाला.

वडगाव मावळ येथील दत्तात्रय भिकू ढोरे यांना शनिवारी कर्वे रोड येथील गॅलक्सी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री कोरोना चाचणीसाठी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्यानंतर मंगळवारी सकाळी अचानक गॅलक्सी हाॅस्पिटलने ढोरे यांना बाहेर काढले. कोरोना रुग्णांवर उपचाराची सोय आमच्याकडे नाही, असे कारण त्यासाठी गॅलक्सी हाॅस्पिटलने दिले.

 

अचानक हाॅस्पिटलने बाहेर काढल्याने ढोरे यांचे प्रचंड हाल झाले. पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम हाॅस्पिटल मध्ये बेड बुक केला आहे. तेथे रुग्णाला घेऊन जा, असे गॅलक्सी हाॅस्पिटलच्या प्रशासनाने ढोरे यांच्या कुटुंबीयांना सांगितले, मात्र असा कोणताही बेड उपलब्ध नसल्याचे वायसीएम हाॅस्पिटलमध्ये गेल्यावर ढोरे यांना कळले.

त्यानंतर हा रुग्ण दिवसभर वायसीएम हाॅस्पिटलच्या बाहेर रुग्णवाहिकेत झोपून होता. ढोरे यांना संध्याकाळी तळेगाव येथील एका खाजगी हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.ढोरे यांच्या मृत्यूला गॅलक्सी हाॅस्पिटलचे व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप ढोरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.