Pune : गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे भासवून तीस हजारांची लाच स्वीकारणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – तक्रारदाराविरोधात चिखली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज आला आहे. त्याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगून एका व्यक्तीकडून तीस हजारांची लाच घेताना तिघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. एक लाख रुपयांची मागणी केली असता तडजोडीअंती तीस हजार रुपये देण्याचे ठरले होते.

दशरथ दत्तात्रय शिंदे (वय 37, रा. एकलहरे, ता. आंबेगाव), अॅड संतोष पोपट थोरात (वय 32, रा. एक लॉन सोसायटी, खराडी पुणे) आणि मंगेश उत्तम जिवडे (वय 40, रा. थिटे वस्ती, खराडी पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 34 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष याने तक्रारदाराला ‘त्यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज आला आहे. त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अहिरे करीत आहेत. त्या तक्रारीमध्ये गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच तक्रारदाराकडून चौकशीसाठी घेतलेले मोबाईल आणि प्रोजेक्टर परत करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली.

दशरथ याने तो गुन्हे शाखेचा पोलीस हवालदार असून तो स्वतः हे प्रकरण पाहत असल्याचे भासवले. तडजोडीअंती तीस हजार रुपये देण्याचे ठरले असता मंगळवारी (दि. 7) खराडी येथील हॉटेल परमहंस समोर लाच घेताना तिघांना एसीबीच्या पथकाने सापळा रचून पकडले. चौकशीमध्ये तिन्ही आरोपी हे खाजगी व्यक्ती असल्याचे समोर आले. त्यांनी लोकसेवक असल्याचे भासवून ही लाच स्वीकारली आहे.

  • ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधिक्षक प्रतीभा शेडगे, पोलीस कर्मचारी श्रीकृष्ण कुंभार, कृष्णा कुऱ्हे, स्नेहा मस्के, राऊत, थरकार, जाधव यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.