Pune : कॉसमॉस बँक निवडणूक : मुकुंद अभ्यंकर, मिलिंद काळे यांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

एमपीसी न्यूज – सहकार क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत उत्कर्ष पॅनेलचे सर्व तेरा उमेदवार विजयी झाले. बँकेचे समूह अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर आणि विद्यमान अध्यक्ष, सनदी लेखापाल मिलिंद काळेप्रणीत उत्कर्ष पॅनेलने या निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी केली.

विजयी उमेदवारांमध्ये कॉसमॉस बँकेचे विद्यमान समूह अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर, विद्यमान अध्यक्ष मिलिंद काळे, विद्यमान संचालक प्रल्हाद कोकरे, तसेच जयंत बर्वे, यशवंत कासार, प्रवीण कुमार गांधी, सचिन आपटे, प्रा नंदकुमार काकिर्डे, अजित गिजरे, अरविंद तावरे, मिलिंद पोकळे, अॅड. अनुराधा गडाळे, राजेश्वरी धोत्रे यांचा समावेश आहे.

वर्ष २०२० ते २५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी २२ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. कर्वे रस्त्यावरील हर्षल सभागृह येथे शुक्रवारी मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश कोतमिरे यांनी निवडणूक निकाल जाहीर केला.

बँकेवर झालेला सायबर हल्ला आणि अन्य मुद्द्यांमुळे ही निवडणूक चर्चेत होती. त्यातच उत्कर्ष पॅनेलच्या विरोधात असलेल्या सहकार पॅनेलमध्ये बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्यासह सहा विद्यमान संचालक निवडणूक रिंगणात होते. तसेच राज्याचे माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी आणि इतर पाच जण या पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष विरुद्ध विद्यमान संचालक यांच्यात ही निवडणूक झाली. त्यामध्ये विद्यमान समूह अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर आणि विद्यमान अध्यक्ष सनदी लेखापाल मिलिंद काळे यांच्या उत्कर्ष पॅनेलला घवघवीत यश मिळाले.

बँकेच्या पुण्यासह गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात शाखा आहेत. बँकेचे एकूण ८० हजार सभासद असून त्यातील ५९ हजार जणांना मतदानाचा अधिकार आहे. त्यापैकी ३६ हजार सभासद पुणे आणि आठ हजार उर्वरित महाराष्ट्रातील आहेत. तर, परराज्यातील सभासद मतदारांची संख्या १५ हजार आहे. पुण्यातील सर्वाधिक सभासद असल्याने त्याचा फायदा उत्कर्ष पॅनेलला झाल्याचे निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.