Pune : जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे; जगताप की भेगडे ?

( गणेश यादव)

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री गिरीश बापट पुणे मतदारसंघाचे खासदार झाल्याने रिक्त झालेले पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता लागली आहे. पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि पुणे जिल्हाध्यक्ष मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

जून महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये आमदार जगताप किंवा भेगडे या दोघांपैकी एकाची कॅबिनेट अथवा राज्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाकडे पालकमंत्रीपद येऊ शकते. ऐनवेळी दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांना देखील पालकमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण, कुल यांच्या पत्नी कांचन यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचे धाडस पेलत त्यांना कडवे आव्हान दिले होते.

विधानसभेच्या निवडणुका चार महिन्यावर आल्या आहेत. त्यामुळे चार महिन्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे किंवा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे देखील पालकमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या कांबळे परभणीचे तर शिवतारे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

लक्ष्मण जगताप प्रबळ दावेदार

पालकमंत्रीपदासाठी पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप प्रबळ दावेदार मानले जातात. कारण, जगताप यांनी अजित पवार यांचा बालेकिल्ला उध्वस्त करत पिंपरी महापालिकेवर एकहाती कमळ फुलविले. महापालिकेत सत्ता आल्यास ‘लाल’ दिवा देण्याचे आश्वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत मित्रपक्ष शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना चिंचवडमधून जगताप यांनी तब्बल 96 हजार 758 हजाराचे मताधिक्य दिले. त्यामुळे बारणे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

या कामगीरीमुळे पालकमंत्रीपदासाठी जगताप यांचे पारडे जड मानले जात आहे. तसेच आमदारकीची त्यांची तिसरी टर्म आहे. एकवेळेस विधानपरिषदेचे देखील जगताप आमदार होते. त्यांचा अनूभव दांडगा आहे. दरम्यान, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या एकाही आमदाराला मंत्रीपद दिले नाही. पण आता इतर पक्षातून आलेले आमदार नाराज होऊ नयेत यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रीपद दिले जाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बाळा भेगडे यांचाही ‘क्लेम’

पालकमंत्रीपदासाठी भाजप पुणे जिल्हाध्यक्ष मावळचे आमदार बाळा भेगडे हे देखील प्रबळ दावेदार आहेत. सलग दोनवेळा ते मावळमधून निवडून आले आहेत. जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. तळेगाव दाभाडे, लोणावळा, आळंदी नगरपरिषदेत भाजपची सत्ता आणली. तसेच लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांना मावळमधून 21 हजार 827 मतांची आघाडी दिली. भेगडे भाजपचे निष्ठावान आणि जुने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पालकमंत्रीपदासाठी भेगडे सुद्धा प्रबळ दावेदार मानले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.