Vadgaon Maval : सरपंच दत्तात्रय पडवळ व सामाजिक कार्यकर्ते संतोष कुंभार यांना भास्कर अ‍ॅवॉर्ड-2019 पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या दि प्राईड ऑफ इंडिया: भास्कर अ‍ॅवॉर्ड-2019 ची घोषणा करण्यात आली असून देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये नवलाख उंबरेचे सरपंच दत्तात्रय पडवळ तसेच कामशेत येथील सामाजिक कार्यकर्ते ह भ प संतोष कुंभार यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजीव लोहार यांनी दिली. हा पुरस्कार सोहळा सोमवारी ( दि.27) पणजी येथील दीनानाथ मंगेशकर कला अकादमी येथे होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे उपस्थित राहाणार असून प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा भाजपा प्रदेशाध्यक्ष, खासदार विनय तेंडोलकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, दिगंबर कामत आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.

सरपंच दत्तात्रय पडवळ हे विद्यमान सरपंच असून यांनी खासदार फंड, जिल्हा परिषद फंड, पंचायत समिती फंड अशा विविध फंडामधून गावामध्ये अनेक विकास कामे केली आहेत. त्याशिवाय पाणी वाचवा अभियान, स्वच्छता अभियान, स्थानिक बेरोजगारांना एमआयडीसी मध्ये रोजगार उपलब्ध करून दिला. पडवळ हे अखिल भारतीय सरपंच संघटनेचे विद्यमान अध्यक्ष असून पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ते उपाध्यक्ष तर नवलाख उंब्रे विविध कार्यकारी सेवा विकास संस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य आहेत.

ह भ पसंतोष कुंभार हे कुंभार समाज समाजोन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष असून त्यांनी संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. संस्थेच्या माध्यमातून मागील 12 वर्षांपासून 10 वी 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन केले जाते. गोरोबा काका पायी पालखी सोहळ्याचे ते अध्यक्ष असून आळंदी ते पंढरपूर हा पायी पालखी सोहळा आयोजित केला जातो. कुंभार हे पुणे जिल्हा भाजपा ओबीसीसेलचे युवा मोर्चा अध्यक्ष आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.