Pune : भुसार बाजार बुधवार पासून सुरू होणार

एमपीसी न्यूज – पुणेकरांची गैरसोय आता दूर होणार आहे. व्यापाऱ्यांनी पुकारलेला भुसार आणि गुळ बंद करण्याचा निर्णय आता मागे घेतला आहे. येत्या बुधवार पासून पुन्हा भुसार बाजार सुरू होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आता किराणा माल उपलब्ध न होण्याचे संकट दूर झाले आहे.

मालवाहतूक करणारे वाहन चालक आणि कामगार यांना कोणताही त्रास होणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.  सध्या कोरोनामुळे पोलीस विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला होता. दि पुना मर्चंट चेंबर आणि प्रशासनाच्या दरम्यान झालेल्या चर्चेत हा बंद मागे घेण्यात आला. पुणेकरांना सध्या भाजीपाला मिळत नाही.

लवकरच हा विभागही सुरू होणार आहे. फळेही मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने गुलटेकडी ते कोंढवा पर्यंतचा भाग सील करण्यात आला आहे. तर, आणखी 22 ठिकाणी सील करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ठेवला आहे. आज आणखी 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

व्यापाऱ्यांनी आता भुसार बाजार बंद मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा भीतीमुळे कामगार मोठ्या प्रमाणात गावी गेले आहेत. कामगारांची टंचाई असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लवकरच फळे आणि भाजीपाला मिळणार असल्याने पुणेकरांची चिंता दूर होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.