Pune : महापालिका करणार गणेशमूर्ती विसर्जनासाठी शंभर टन अमोनियम बायकार्बोनेटची खरेदी

एमपीसी न्यूज : गणेशमूर्ती विसर्जनासाठी राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स यांच्याकडून 100 टन अमोनियम बायकार्बोनेट खरेदी करण्यासाठी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यासाठी 18 लाख 19 हजार 560 रुपये खर्च येणार आहे. 

पालिका गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी दरवर्षी अमोनियम ची खरेदी करते या वर्षी शंभर टन अमोनियम कार्बोनेट खरेदीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यासाठी राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड यांना 18 लाख रुपये दिले जाणार आहेत. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली आहे.

गणेश मूर्तींचे विसर्जन नदीपात्रात न करता त्यासाठी हौद व टाक्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा विसर्जनाची समस्या अजूनही कायम आहे. मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने त्यांची विल्हेवाट लावताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  त्यासाठी पुणे महापालिका, कमिंस इंडिया,  राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रमुख गणेश मंडळांनी संयुक्त विद्यमाने संपूर्ण पर्यावरणपूरक पद्धतीने आपल्या आवडत्या गणपती बाप्पांचे घरच्या घरी विसर्जन करण्याचा अभिनव पर्याय शोधला आहे.

यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचा वजनाएवढा अमोनियम बायकार्बोनेट पाण्यामध्ये विरघळून गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते.  घरगुती गणेश मूर्ती ते गणेश मंडळांच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जन करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करता येऊ शकतो. या पर्यावरणपूरक विसर्जन तयार होणाऱ्या पाण्याचा वापर  खत म्हणून करता येऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.