Pune News : राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेचे पडसाद पक्षातही, पुण्यात पहिला राजीनामा

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात महा विकास आघाडी सरकारवर कठोर शब्दात टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेकांचा समाचार घेतला.

यावेळी राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे यांनाही विरोध केलाय. सरकारने हे भोंगे नाही काढले तर मनसैनिकांना मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा चालवा असा आदेश दिला. राज ठाकरे यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्याचे पडसाद पुण्यातही उमटले असून पुण्यात एका मनसैनिकांनी राजीनामा दिलाय.

पुण्यातील मनसे पदाधिकारी असलेल्या माजिद शेख यांनी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचे सांगितले. या पत्रात त्यांनी लिहिले राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुस्लिमद्वेषी भूमिकेमूळे आम्ही नाराज आहोत. साहेब ब्लू प्रिंट आणणार म्हणून आम्ही मनसेत गेलो होतो. राजसाहेब ठाकरे यांनी विकास महागाई शिक्षण बेरोजगारी या विषयाला बगल देऊन जात आणि धर्माला प्राधान्य दिल्याने राजीनामा दिल्याचं माजिद शेख यांनी पत्रात लिहिले.

खरं तर राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे मनसे नेत्यांची गोची होणार आहे. मनसे नेत्यांच्या अनेक मतदारसंघात मुस्लिमांची संख्या जास्त आहे. पुण्यातील दोन्ही नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात ही मुस्लीम मतांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे त्या दोघांचे अडचण होणार आहे. त्यामुळे हे दोघेही नाराज असल्याचं बोललं जातं. अद्याप त्या दोघांनी याविषयी बोलण्यास नकार दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.