Pune News : रांगोळी स्पर्धेत उमटले महागाईचे प्रतिबिंब

एमपीसी न्यूज – पेट्रोल-डिझेलचा उडालेला भडका, गॅस सिलेंडर मधील दरवाढ, गृहिणींचे कोलमडलेले बजेट, आरोग्य-शिक्षणाच्या महागल्या सुविधा, महागाईमुळे पिचलेला सामान्य माणूस, महिला-शेतकरी-नोकरवर्ग यांना होणार त्रास रांगोळीतून प्रतिबिंबित झाला. निमित्त होते, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत आयोजित महागाईवरील रांगोळी प्रदर्शन व स्पर्धेचे!

घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रातील आर्ट गॅलरी, बाळासाहेब ठाकरे कलादालन, बालगंधर्व कलादालन येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. बुधवारी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्या हस्ते प्रदर्शनातील उत्कृष्ट रांगोळींना बक्षिसे देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार, सप्ताहाचे संयोजक मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश काँग्रेसचे संजय बालगुडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या रांगोळी स्पर्धेत भाग्यश्री देशपांडे प्रथम, गौरी रोठे द्वितीय, मयूर दुधाळ तृतीय, तर ज्ञानेश्वरी कोतली, रचना गवळी, पूनम पोटे, महेंद्र मेटकरी यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. प्रथम क्रमांकास सात हजार, द्वितीय क्रमांकास पाच हजार, तृतीय क्रमांकास तीन हजार व उत्तेजनार्थ प्रत्येकी एक हजार रुपये रोख पारितोषिक व प्रशस्तिपत्रक देण्यात आले.

यावेळी बोलताना मोहन जोशी म्हणाले, ‘सप्ताहाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांना जोडण्याचे काम करत आहोत. सामान्य माणूस महागाईचे चटके सहन करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘अच्छे दिन’चे दिवास्वप्न दाखवले. ते खोटे ठरले. रांगोळी स्पर्धेतून कलाकारांना व्यक्त होण्यास वाव मिळाला.’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता तिवारी यांनी केले. कल्याणी साळुंखे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.