Ravet News : विजेच्या लपंडावामुळे रावेत गावकरी हैराण

एमपीसी न्यूज – महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे रावेत गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिक हैराण झाले असून, अनेक समस्यांचा सामना करीत आहेत.

रावेत येथील गावठाणसह शिंदे वस्ती, भोंडवे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने परिसरात धूराची फवारणी देखील बर्‍याच दिवसांपासून होत नसल्याने अंधार झाला की, किडे आणि डासांच्या त्रासाने नागरिकांना विश्राम करणे सुद्धा अवघड होऊन बसले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील जवळपास दोन वर्षांपासून, अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत, तसेच मुलांचे शाळेचे वर्गही ऑनलाईन सुरू आहेत. त्यामुळे लॅपटॉप, मोबाईल चार्ज करून ठेवावा लागतो. मात्र विजेच्या लपंडावाने लॅपटॉप आणि मोबाईल पूर्ण चार्ज होत नाहीत. त्यामुळे सर्वांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत महावितरण कार्यालयाशी संपर्क साधल्यावर केबलच्या कामामुळे विज पुरवठा काही वेळासाठी खंडित केल्याची माहिती कर्मचार्‍यांकडून दिली जाते.

मात्र नागरिकांना तासन तास विजेची वाट पाहावी लागत आहे. तसेच येथील स्थानिक प्रतिनिधी देखील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून रावेत भागातील विज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, सोबतच महापालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरात धूराची फवारणी वेळेवर करावी. अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.