Ravet : धक्कादायक! निवासी अकॅडमीमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; संचालकासह एका माजी विद्यार्थिनीस अटक

एमपीसी न्यूज – रावेत येथील (Ravet) एका निवासी अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनीवर क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. त्यासह अकॅडमीच्या एका माजी विद्यार्थिनीला देखील अटक केली आहे.

क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक नौशाद अहमद शेख (वय 58) आणि माजी विद्यार्थिनी या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित 16 वर्षीय मुलीच्या वडिलांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी याबाबत माहिती दिली. नौशाद शेख हा क्रिएटिव्ह अकॅडमी या नावाखाली निवासी शाळा चालवतो. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन मुलांना-मुलींना आठवी ते बारावी करिता निवासी शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी सेमिनारद्वारे प्रोत्साहित करतो. सन 2021 मध्ये शेख याने यवतमाळ मध्ये जाऊन अशाच प्रकारे सेमिनार घेतला होता. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तिला नववी इयत्तेमध्ये निवासी शाळेत 2 लाख 26 हजार रुपये भरून प्रवेश घेऊन दिला होता.

या शाळेमध्ये सध्या सुमारे 75 मुली आणि 100 पेक्षा अधिक मुले आठवी ते बारावी इयत्तेचे शिक्षण घेत आहेत. येथे शिकणाऱ्या मुलांना मोबाईल वापरण्यास तसेच कुटुंबाशी संपर्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. महिन्यातून एकदा पालक मीटिंगसाठी आल्यानंतर आपल्या पाल्याला भेटू शकतात; असा येथील नियम आहे. त्यामुळे येथे घडणाऱ्या प्रकाराची माहिती पाल्य आपल्या पालकांना वेळीच देऊ शकत नाहीत.

शेख या क्रिएटिव्ह अकॅडमीच्या मुलींच्या हॉस्टेलमध्येच पहिल्या मजल्यावर राहतो. त्याने पीडित मुलगी 14 वर्षांची असताना वारंवार अत्याचार केले आहेत. मुलीवर सुरुवातीला 2022 मध्ये त्याने तो राहत असलेल्या फ्लॅट मध्ये बोलावून घेत विनयभंग करून अत्याचाराचा प्रयत्न केला होता. तेव्हा पीडित मुलीने त्याला विरोध करून ती तिथून निघून गेली होती. मात्र त्यानंतर शेख हा पीडित मुलीला जाणीवपूर्वक त्रास देऊ लागला ‘तुझ्या घरच्यांना फोन करून तुझे येथील मुलांबरोबर संबंध असल्याचे सांगेन’ असे धमकावू लागला.

Pune Railway : जानेवारी महिन्यात 19 हजार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वेची कारवाई

नोव्हेंबर 2022 मध्ये शेख याने पीडित (Ravet) मुलीवर पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अकॅडमीच्या एका माजी विद्यार्थिनीने शेख याच्याबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी पीडित मुलीवर दबाव आणल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शेख याने त्याच्या मोबाईल मधील अनेक मुलींचे त्याच्याबरोबर असलेले अश्लील फोटो आणि व्हिडिओ दाखविले होते. यानंतर वारंवार शेख हा पीडित मुलीवर अत्याचार करीत राहिला. ऑगस्ट 2023 मध्ये पीडित मुलीने वडिलांकडे घरी घेऊन जाण्याचा हट्ट केला. त्यानंतर तिला घरी नेण्यात आले. घरी देखील मुलगी ऑगस्ट 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत शांत राहत होती. पालकांनी विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार मुलीने पालकांना सांगितला.

पीडितेच्या आई-वडिलांनी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, स्वप्ना गोरे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मुलीबाबत घडलेल्या या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली.

दहा वर्षांपूर्वी देखील असाच गुन्हा

शेख याच्या विरुद्ध अकॅडमीतील एका विद्या‌र्थिनीने 30 ऑक्टोबर 2014 रोजी लैंगिक शोषण होत असल्याची देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याच अकॅडमीमध्ये शिकत असणाऱ्या इतर विद्यार्थिनींनीही असे प्रकार घडत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. या घटनेच्या विरोधात शहरातील विविध महिला तसेच सामाजिक संघटनांनी मोर्चा काढत शेखला अटक करण्याची मागणी केली. मात्र, तो गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता. दरम्यान, त्यावेळेस शेख याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पुणे न्यायालयाने तेव्हा त्याचा अटकपूर्व जमीन फेटाळला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.

गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक

या प्रकरणामध्ये पीडित विद्यार्थिनींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनेचे गंभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्तांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. शेख याचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यामध्ये अश्लील साहित्य सापडले आहे. सर्व आजी-माजी विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.