Pimpri : अवैध बांधकामे, टप-या, पत्राशेडची नोंद करुन मालमत्ता कर वसूल करा

स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या सूचना 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांची नोंद करण्यात यावी. खासगी जागेत असलेल्या टप-या, पत्राशेडला 11 महिन्याचा कराराने परवाना देऊन त्यांच्याकडून मालमत्ता कर वसूल करण्यात यावा. बांधकाम परवानगी विभागाकडून पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. परंतू करआकारणी झालेली नाही. अशा मालमत्तांची नोंद करुन कर आकारणी करावी. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढावेत. मालमत्ता कर थकविणा-यांवर जप्तीची कारवाई वर्षभर सुरु ठेवण्यात यावी, अशा सूचना स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच अनधिकृत घरांच्या नोंदी केल्यास 100 कोटी, टप-या, पत्राशेडमधून 100 कोटी असे 200 कोटी रुपये उत्पन्न वाढेल, असा दावाही त्यांनी केला. 

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी विलास मडिगेरी प्रयत्न करत आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचे मिळकत कर आणि बांधकाम परवाना हे दोन विभाग महत्वाचे आहेत. या दोन्ही विभागाचे उत्पन्नवाढीबाबत आज (सोमवारी) एकत्रित आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी मडिगेरी यांनी विविध सूचना अधिका-यांना दिल्या. आयुक्त श्रावण हार्डीकर, प्रभारी शहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, कर आकारणी विभागीय कार्यालयाचे मंडल अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

बैठकीची पत्रकारांना माहिती देताना मडिगेरी म्हणाले, उत्पन्नवाढीच्या दृष्टीने महापालिका हद्दीतील सर्व मिळकतींची नोंदणी होणे आवश्यक आहे. बांधकाम परवानगी विभागाकडून दिलेल्या जाणा-या परवानगीची यादी कर संकलन विभागाला पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवीन मिळकतीची नोंद सुरु झाली आहे. परिणामी, उत्पन्न वाढीत भर झाली आहे. गतवर्षी बांधकाम परवनगीतून आजच्या तारखेला 58 कोटी 81 लाख उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यामध्ये वाढ झाली असून आजमितीला तब्बल 113.13 कोटी रुपयांचे उत्त्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेने दुपटीने उत्पन्नात वाढ झाली आहे. तर, मालमत्ताकरातून गतवर्षी 82 कोटी 91 लाख उत्पन्न मिळाले होते. यंदा तब्बल 128.63 कोटी रुपयांचा महसूल महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेने 56 टक्के उत्पन्नात वाढ झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी वाघेरे येथील करसंकलन कार्यालयाने 36 कोटी 97 या उदिष्टापैंकी 10 कोटी 68 लाखाचा सर्वाधिक कर वसूल केला आहे. तर, सर्वात कमी तळवडेतील विभागीय कार्यालयाने 10 टक्के कर वसूल केला आहे. तळवडेत अनधिकृत मालमत्ता आहेत. या मालमत्तांना येत्या आठ दिवसात नोटीस देऊन कर वसूल करावा. कराचा भरना न केल्यास मालमत्ता पाडण्यात यावी. तळवडेतील दोन पेट्रोल पंपाची तीन वर्षांपासून नोंद झाली नाही. त्याची नोंद करण्याची सूचनाही मडिगेरी यांनी केली आहे.

आतापर्यंत प्रलंबित असलेली करआकारणी प्रकरणे, सर्वेक्षणात आढळून आलेल्या मिळकती, बांधकाम परवानगी विभागाकडून पुर्णत्वाचा दाखला आला आहे. परंतू करआकारणी झालेली नाही. अशा सर्व मिळकतींची करआकारणी तातडीने करण्यात यावी. खासगी जागेत असलेल्या टप-या, पत्राशेडला 11 महिन्याचा कराराने परवाना देऊन त्यांच्याकडून मालमत्ता कर वसूल करण्यात यावा. मिळकत कर नोंदणीबाबत न्यायालयात प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत. जेणेकरुन महापालिकेच्या उत्पन्नात अंदाजे 200 कोटी रुपयांची वाढ होईल.  मिळकत जप्तीची कारवाई वर्षभर सुरु ठेवण्यात यावी असा आदेश मडिगेरी यांनी दिला.

कर्मचा-यांची रोकड हाताळणी कमी व्हावी. जास्त मिळकत कर जमा व्हावा यासाठी कर आकारणीची बिले वाटप करताना नागिरक कर भरण्यास तयार असतील. तर, बीले वाटप करणा-या प्रत्येक कर्मचा-यांकडे मिळकत कर वसुलीकामी स्वाईप मशिन देण्याबाबत विचार करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.  दरमहिन्याला ज्या करसंकलन विभागाचे उत्पन्न ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा जास्त मिळेल. जास्तीत-जास्त करआकारणी प्रकरणे निर्गत होतील त्या विभागाचे प्रशासन अधिकारी व मंडालधिकारी यांचा स्थायी समिती सभेत सत्कार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.