Chinchwad news: रावेत ते बालेवाडीदरम्यान द्रुतगती महामार्गावरील खड्डे, सर्व्हिस रस्त्यांची दुरूस्ती

एमपीसी न्यूज – रावेत ते बालेवाडीदरम्यान द्रुतगती महामार्गावरील खड्डे दुरूस्ती, सर्व्हिस रस्त्यांची दुरूस्ती आणि नियमित देखभाल दुरूस्तीचे काम वेळीच करण्याचे आदेश राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला दिले आहेत. तसेच महामार्गावरील दुभाजकांमध्ये वृक्षारोपण केलेल्या झाडांची वाढ झाली नसेल किंवा झाडांचे नुकसान झाले असेल. तर,  झाडे बदलण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही संबंधित ठेकेदाराला देण्यात आले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाची पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत दुरवस्था झाल्याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी लक्ष वेधले होते. त्यांनी हा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी उपस्थित केला होता.

पुणे-मुंबई हा देशातील पहिला द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस-वे) आहे. हा द्रुतगती मार्ग सहापदरी करण्याचे काम सुरू आहे. हा महामार्ग वाकड ते रावेत-किवळे दरम्यान पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून जातो. पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूला तसेच दुभाजकांमध्ये कोणत्याही प्रकारचे सुशोभिकरण करण्यात आलेले नव्हते. त्याचप्रमाणे या महामार्गाच्या शेजारचे सर्व्हिस रस्ते चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे आसपासच्या परिसरातील वाहनचालकांना त्याचा त्रास होत होता.

या सर्व बाबींची दखल घेऊन आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांच्या प्रतिनिधींची मध्यंतरी बैठक घेतली होती. तसेच या सर्वांना सोबत घेऊन वाकड ते रावेत-किवळे दरम्यान झालेली महामार्गाची दुरवस्था दाखविली होती. त्यावेळी अधिकारी आणि ठेकेदाराच्या प्रतनिधींना खडे बोल सुनावत वाकड ते रावेत-किवळे दरम्यान द्रुतगती महामार्गाचे सुशोभिकरण, चांगल्या दर्जाचा रस्ता आणि सर्व्हिस रस्त्यांच्या दुरूस्तीची तंबी दिली होती. तसेच आमदार जगताप यांनी एवढ्यावरच न थांबता हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला होता.

आमदार जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचे रावेत ते बालेवाडीदरम्यान झालेल्या दुरावस्थेबाबत कपात सूचना मांडली होती. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना लेखी पत्र पाठवून द्रुतगती महामार्गाच्या दुरूस्तीबाबत माहिती दिली आहे. आमदार जगताप यांच्या कपात सूचनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला रावेत ते बालेवाडीदरम्यान दुभाजक बसविण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच सवलत करारानुसार या महामार्गावर आवश्यक तेथे कॅट आईज, थर्मोप्लॅस्टिक पेंट आणि रिफ्लेक्टर्स बसवावे, खराब होणाऱ्या सर्व्हिस रस्त्यांचे नियमित देखभाल दुरूस्ती कामांतर्गत दुरूस्ती करावे, खड्ड्यांची दुरूस्ती व नियमित देखभाल दुरूस्तीची कामे वेळीच करावेत तसेच दुभाजकांमध्ये वृक्षारोपण केलेल्या झाडांची वाढ झाली नसल्यास किंवा झाडांचे नुकसान झाले असल्यास तेथील झाडे बदलण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही संबंधित ठेकेदाराला देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.