Ind v/s Eng 4th test : भारतीय संघाने केली पिछाडीनंतर जबरदस्त वापसी,रोहित शर्माने केले शानदार शतक

एमपीसी न्यूज : (विवेक दि.कुलकर्णी) पहिल्या डावातली खराब कामगिरी मागे टाकत दुसऱ्या डावात नव्याने सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाने शनिवारी सलामीवीर रोहित शर्माच्या शानदार आठव्या कसोटी शतकाच्या जोरावर शानदार कामगिरी करत आपले आव्हान जिवंत ठेवले.

कालच्या दिवसाच्या नाबाद जोडीने आज पुढे खेळताना 83 धावांची सलामी भागीदारी दिली. रोहित शर्माच्या तुलनेत लोकेश राहुल आज जास्त आक्रमक शैलीत खेळत होता, त्याने एक देखणा षटकार सुद्धा मारला होता, त्याला आज चांगलीच लय सापडली असे वाटत असतानाच वैयक्तिक 46 धावांवर तो जिम्मी अँडरसनच्या एका अप्रतिम इनस्विंगवर यष्टीमागे झेल देऊन बाद झाला.

त्यानंतर आलेल्या चेतेशवर पुजाराने आपल्या चिरपरिचित अंदाजाच्या अगदी विपरीत पण महत्वाची आणि विश्वासपूर्ण खेळी सुरू केली, त्याचा धावा काढण्याचा वेग आज एकदम वेगळा होता. रोहित बरोबर प्रथम अर्धशतकी भागीदारी करताना त्याने संघाला आघाडी मिळवून दिली.

बघताबघता तो आणि रोहित शर्मा धावफलकावर धावा आणि आघाडी दाखवत होता, याच दरम्यान रोहित शर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले, त्याच्या आक्रमक शैलीला मुरड घालत संघहित डोळ्यापुढे ठेवून आज रोहित खेळत होता, यादरम्यान त्याला दोनदा जीवदानही मिळाले, पण नशीब नेहेमीच शुराला साथ देते या म्हणीला सार्थ ठरवत त्याने एकेरी दुहेरी धावा गोळा करतानाच खराब चेंडूचा योग्य समाचार घेत आपली खेळी सजवली.

80 धावा झाल्यावर मात्र त्याने मोईन अलीचा समाचार घेत शतकासमीप झेप घेतली आणि 94 वरून मिडऑनला एक उत्तुंग षटकार मारत आपले वैयक्तिक आठवे आणि भारताबाहेरचे पहिलेच शतक नोंदवले, लॉर्ड्स वर त्याला दिलेल्या शतकीय हुलकावणीने निराश न होता त्याने ओव्हलवर संघहित डोळ्यापुढे ठेवून केलेले शतक भलेही त्याच्या लौकिकानुसार नसेलही, पण त्याने संघहित पाहून केलेली ही खेळी कायम इतिहासात नोंदवली जाईल,

ज्याने मरगळलेल्या भारतीय संघात नवसंजीवनी आणली असे म्हणाले तर त्यात कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती वाटणार नाही. त्याने पूजाराबरोबर दिडशतकी भागीदारी नोंदवून संघाला बऱ्यापैकी लढत देण्याची ताकत मिळवून दिली आहे.

यामुळेच कदाचित पुजाराने सुद्धा आपले वैयक्तिक आणि तसे बऱ्यापैकी जलद असे अर्धशतक सुद्धा नोंदवले. ही जोडी बऱ्यापैकी स्थिरावली असतानाच इंग्लिश संघाने दुसरा नवा चेंडू घेतला.आणि त्याचा फायदा उठवताना रॉबिनसनने एकाच षटकात जम बसलेल्या रोहीत आणि त्यानंतर पुजाराला अप्रतिम चेंडू टाकत फसवले आणि इंग्लिश चाहत्यांनी सुटकेचा श्वास सोडला खरा, पण त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी उर्वरित वेळात अधिक नुकसान न होवू देता संघाला तिसऱ्या दिवसाखेर 171 धावांची समाधानकारक आघाडी मिळवून दिली आहे.

आता सामन्याचे दोन दिवस बाकी असून भारतीय संघाच्या सात विकेट्स बाकी आहेत, त्यामुळे आता तरी काल पर्यन्त हरणार असे वाटणारा भारतीय संघ उद्या आणखी दीडशेच्या आसपास जरी धावा वाढवू शकला तर कदाचित जिंकू सुद्धा शकतो अशी आशा निर्माण झाली आहे.

आणि हीच कसोटीक्रिकेटची खरी गंमत आहे.आजच्या दिवसाचा मानकरी ठरलेल्या रोहीत शर्माने वैयक्तिक अनेक विक्रम गाठले आहेत, त्याने 2019 पासून 13 सर्वाधीक आंतरराष्ट्रीय शतके नोंदवली आहेत,त्याने विल्लीयमसन, जो रूट यांना सुद्धा मागे सोडले आहे,त्याने 440 आंतरराष्ट्रीय सर्व फॉरमॅट मध्ये षटकार मारत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत चौथा क्रमांक मिळवला आहे.

तर त्याने आठ पैकी तीन कसोटी शतके षटकार मारत पूर्ण केली आहेत.त्याच्या या पराक्रमामुळे उद्या उर्वरित भारतीय फलंदाज सुद्धा आपली जबाबदारी ओळखून ती चोख पार पाडत आपल्या संघाला साडेतीनशेच्या आसपासची आघाडी मिळवून देतील आणि मग जलदगती गोलंदाजही आपली कामगिरी योग्यरित्या पार पाडतील अशी आशा बाळगायला काय हरकत आहे आणि तसेही कसोटी क्रिकेटमध्ये काहीही चमत्कार घडू शकतो असे म्हणतात तर तो उद्या आपल्या बाजूनेच का असू नये,खरे ना?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.