Ind v Eng 4th Test : पहिल्या डावातली पिछाडीवरुन भारतीय संघ दुसऱ्या डावा नंतर मजबूत स्थितीत

एमपीसी न्यूज : (विवेक दि.कुलकर्णी): सलामीसह प्रत्येक फलंदाजानी आपली जबाबदारी ओळखून आणि ती योग्यरित्या पार पाडल्याने कालपरवा पर्यंत या सामन्यात पिछाडीवर वाटणारा भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावा नंतर एकदम मजबूत स्थितीत आलेला आहे.

भारताने दुसऱ्या डावात 466 धावां केल्या असून पहिल्या डावातल्या 99 धावांच्या पिछाडी मागे टाकुन भारत 366 धावांनी पूढे आहे, त्यामुळे आता या कसोटीत भारतीय संघ नक्कीच हारणार नाही अशी खात्री क्रिकेट रसिकांना वाटत आहे,  क्रिकेट मध्ये कधीही भाकीत करू नये असे म्हणतात पण तरीही या कसोटीत भारत हारणे अशक्य वाटते आहे.

आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या कालच्या नाबाद फलंदाजानी आपल्या विकेट्स राखत भारतीय डावाला स्थैर्य देणारी फलंदाजी केली. जडेजा मात्र 19 धावा करून बाद झाला, पाठोपाठ अजिंक्य रहाणेचे अपयश आजही त्याची साथ सोडत नव्हते, तो आज एकही रन करू शकला नाही,

दुसऱ्या बाजूला कोहली मात्र बऱ्याच दिवसांनी लयात आलेला वाटत होता, त्याचे देखणे ड्राइव्हस आणि सकारात्मक देहबोली आज तो मोठी खेळी करणार असेच दर्शवत असताना मोईन अलीने त्याला 44 धावांवर स्लिप मध्ये झेलबाद केले,एकापाठोपाठ एक अशा तीन विकेट्स गेल्याने इंग्लंड समर्थक जोशात होते,तर भारतीय समर्थक मात्र निराश,

पण मैदानावर असलेल्या शार्दुल ठाकूरने मात्र आजही पहिल्या डावातल्या सारखीच फलंदाजी करताना पंत पेक्षाही आक्रमक फलंदाजी करताना या कसोटीत दोन्ही डावात अर्धशतक करण्याची मोठी कामगिरी केली,त्याचा जोश बघून पंतही सुंदर फलंदाजी करू लागला,बघताबघता भारतीय संघाने तीनशेच्या आसपास आघाडी मिळवली होती,

मात्र शार्दुल ठाकूर 66 तर पंत 50 धावा करून बाद झाल्यानंतर उर्वरित फलंदाज लवकर बाद करू असे रुटला वाटत असतानाच जसप्रीत बुमराह सह उमेश यादवने सुद्धा उपयुक्त आणि आक्रमक धावा जोडताना संघाला 466 अशी मोठी धावसंख्या गाठून दिली.

बऱ्याच दिवसांनी आज भारतीय फलंदाजी अजिंक्य रहाणेचा अपवाद सोडता बहरलेली दिसली ज्याचा मोठा फायदा भारतीय संघाला झाला आणि त्यामुळेच इंग्लंड संघापुढे विजयासाठी 367 धावांचे विशाल लक्ष ठेवण्यात कोहलीची टीम यशस्वी झाली.

इंग्लडतर्फे वोक्सने सर्वाधिक तीन बळी घेत आपली पुनरागमनाची कसोटी यादगार केली,त्याला मोईन अली व रॉबिनसनने दोन दोन बळी घेत साथ दिली.पण तोवर भारतीय संघाने एक विशालकाय धावसंख्या उभारली होती.खेळपट्टी फलंदाजीला धार्जिनी झाली असली तरी सामन्याच्या शेवटच्या दिवशी एवढी मोठी धावसंख्येचा पाठलाग करणे कधीही सोपे नसते या अलिखित भाकीतामुळे भारतीय संघाची बाजू या कसोटीत तरी मजबूत झालेली दिसत आहे.

अर्थात क्रिकेट मध्ये कधीही काहीही चमत्कार होवू शकतो हे ही ज्ञात असल्याने इंग्लंड नक्कीच हा सामना गमावेल असे म्हणणे सुद्धा चुकीचे ठरु शकते.प्रत्युत्तरादाखल  खेळताना इंग्लिश सलामी जोडी रॉरी बर्न्स आणि याशीब हमीदने सावधगिरीने फलंदाजी सुरू करत भारतीय गोलंदाजाचा सामना करताना दिवसाखेर एकही बळी न गमावता बिनबाद 77 धावा करत आश्वस्त सुरुवात केली आहे

आणि आम्ही सुध्दा या सामन्यात बाजी पलटवू शकतोत अस इशाराही भारताला दिला आहे,अर्थात उद्याच्या अंतीम दिवशी 90 षटकात  291 धावा  हव्या असल्याने त्या वाटतात तितक्या नक्की सोप्या नाहीत,पण त्या सोप्या आहेत की अवघड हे उद्याचा दिवस सांगेलच म्हणा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.