Mahavitaran : छतावर सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट महावितरणकडून 4 महिने आधीच पूर्ण

एमपीसी न्यूज – राज्यात वीज ग्राहकांनी (Mahavitaran) छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याबाबत केंद्र सरकारने दिलेले 100 मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट महावितरणने 4 महिने आधी पूर्ण केले असून या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांचे आणि महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. उद्दीष्ट पूर्ण झाले असले तरीही महावितरण ही मोहीम यापुढेही चालूच ठेवणार असून अधिक जोमाने काम करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जा निर्मितीवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलरमुळे ग्राहक स्वतःच वीजनिर्मिती करून वापरतात. त्यामुळे त्यांचे वीजबिल कमी होते. गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली तर त्यांना ती महावितरणला विकता येते.
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकांना 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महावितरणला 19 जानेवारी 2022 रोजी ‘रूफ टॉप सोलार प्रोग्रॅम फेज 2’ अंतर्गत 19 जानेवारी 2024 पर्यंत दोन वर्षात घरगुती ग्राहकांसाठी 100 मेगावॅटचे उद्दीष्ट दिले होते. महावितरणने हे उद्दीष्ट सोमवार दि. 25 सप्टेंबर रोजी म्हणजे चार महिने आधीच पूर्ण केले.
केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयाला महावितरणकडून राज्यातील (Mahavitaran) कामगिरीबाबत दर महिन्याला अहवाल पाठविण्यात येत आहे. कंपनीकडून राज्यात छतावरील सौर ऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांना मदत करण्यात येते. याविषयीची माहिती https://www.mahadiscom.in/ismart या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.
राज्यात 25 सप्टेंबर रोजी रूफ टॉप सोलर वापरणाऱ्या ग्राहकांची एकूण संख्या 1,06,090 झाली आहे. एकूण वीजनिर्मिती क्षमता1,675 मेगावॅट इतकी झाली आहे. राज्यात 2016-17या आर्थिक वर्षात केवळ 1074 ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले होते व त्यांची एकूण क्षमता 20 मेगावॅट होती. त्यानंतर महावितरणकडून विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यात रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत गेली.
सर्वसाधारणपणे एखाद्या कुटुंबाला 3 किलोवॅटचा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प पुरेसा ठरतो. त्यासाठी सरकारकडून सुमारे 43 हजार रुपये ते 56 हजार रुपये अनुदान मिळते. 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पांना 3 किलोवॅटनंतर प्रत्येक किलोवॅटला सुमारे 7 ते 9 हजार रुपये अनुदान मिळते.
वैयक्तिक वीज ग्राहकांसोबतच हाऊसिंग सोसायट्याही रूफ टॉप सोलर योजनेचा लाभ घेतात व त्यांनाही अनुदान मिळते. हाऊसिंग सोसायट्यांना 500 किलोवॅटपर्यंतचा (Mahavitaran) प्रकल्प बसविता येतो व सार्वजनिक सुविधेसाठीच्या या प्रकल्पांना प्रति किलोवॅट 7294 रुपये अनुदान मिळते.