Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे वृक्षदिंडी, वृक्षारोपण उत्साहात 

एमपीसी न्यूज – पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वृक्ष लागवडीचे महत्व सांगण्यासाठी पिंपरीतील नेहरुनगर परिसरात वृक्षदिंडी काढण्यात आली. यामध्ये वारक-यांची वेशभूषा परिधान करून, तोंडी माऊलीचे नाव घेऊन, अभंग-कीर्तन गात, डोईवर तुळस ठेवून विठोबाचा गजर करत चिमुकल्यांनी वृक्षारोपणाचा संदेश दिला. 
 
रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्या वतीने  नेहरुनगर येथील स्मशानभूमी  परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विविध जातींच्या 100 रोपांची लागवड केली. यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे, माजी महापौर हनुमंत भोसले, नगरसेवक राहुल भोसले, रोटरीचे सचिव महादेव शेंडकर, प्रकल्प अधिकारी संतोष भालेकर, रो. भाऊसाहेब पांगारे, माजी अध्यक्षा वर्षा पांगारे, अनिल शर्मा, जसबिंदर सिंग, सुवर्णा काळे, अनिता शर्मा, रुपल काळे आदी उपस्थित होते. 

 
सदाशिव काळे म्हणाले, ‘पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. संपूर्ण जगासाठी पर्यावरणची समस्या संवेदनशील बनली आहे. मानवाने प्रगती साधत असताना पर्यावरणाच्या संतुलनाचा कोणताही विचार न करता अपरिमित असे नुकसान केले आहे. याचे दुष्परिणाम असे झाले की, पर्यावरणाचे संतुलित चक्र तुटले आहे. दुष्काळ अतिवृष्टी, भूकंप, अति हिमवर्षाव अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे सजीवांचे अस्तित्व आबाधित राखायचे असेल तर मानवाला वृक्षाला आपला मित्र बनवून पर्यावरणपूरक जीवन पदधतीचा अवलंब केला पाहिजे. यासाठी पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती महत्वाची आहे’. 
 
कै. भीमराव  भोसले ट्रस्ट संचालित वसंतदादा पाटील प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी नेहरुनगर परिसरात वृक्षदिंडी काढली. ‘पेड लगावो, देश बचाओ’, ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘झाडे लावा, पर्यावरण वाचवा’, निसर्ग वाचवा’,  ‘पर्यावरणाचा झाला -हास वसुंधरेची धरा कास’ यासह अनेक घोषणांनी सर्व परिसर दणाणून सोडला होता. यानतंर मान्यवरांच्या हस्ते स्मशानभूमीच्या  परिसरात वड, पिंपळ, जांभूळ, लिंब, गुलमोहर, कांचन, कवठ, आवळा इत्यादी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.