Talegaon Dabhade: रा. स्व. संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे गोरगरिबांना शिधावाटप

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद- बजरंग दल मावळ व सहयोगी संस्था व सहकारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पवन मावळातील करूंज येथील राऊतवाडीतील श्रमजीवी  गोरगरिब  बांधवांच्या 49 कुटुंबांस त्यांच्या आवश्यकतेनुसार परिपूर्ण असे शिधासंच काल (शुक्रवारी) वितरित करण्यात आले.

सध्याच्या कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सर्वत्र देशवासियांनी शासन निर्देशित व अत्यावश्यक असा सर्वस्तरीय बंद ( लॉकडाऊन) अवलंबला आहे. उद्योग व्यवसाय बंद ठेवल्याने अर्थार्जनात खंड पडला असून त्याच्या परिणामतः जीवनावश्यक साधनसामग्रीची चणचण सर्वत्र निर्माण झाली आहे. राऊतवाडीतील  श्रमजीवी  गोरगरिब  बांधवही याला अपवाद नाहीत. यावर उपाययोजना राबविणाऱ्या उपरोक्त संस्था, संघटनांच्या सदस्यांनी आपले नैतिक दायित्व पार पाडत पुरेशा प्रमाणात शिधासामग्रीचे संच स्वतः तयार करून वाडीतील सर्वच्या सर्व 49   कुटुंबांस वितरित केले.

पश्चिम महाराष्ट्र बजरंग दलाचे संयोजक संतोष भेगडे पाटील यांच्या प्रेरणेने व  अवधूत पोंक्षे ( रा. स्व. संघ, प्रचार विभाग) व सहाय्यक अर्जुन शिंदे ( रा. स्व. संघ, धर्म जागरण ) यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले.  विश्व हिंदू परिषद- बजरंग दलाचे सुशील वाडेकर, महेंद्र आसवले, प्रशांत भेगडे, गणेश कवितके, सुधीर दहिभाते त्याचबरोबर अक्षय भेगडे (भाजयुमो तळेगांव शहर अध्यक्ष),  दीपक भोपे (आधिवक्ता परिषद), शशांक भेगडे ( रा. स्व. संघ), अजित शेलार ( भारतीय प्र. मजदूर संघ ), सौरभ भेगडे यांनी निर्मिती व वितरण व्यवस्थेत पूर्ण सहभाग घेतला.

सर्वात विशेष व अभिनंदनीय बाब म्हणजे मूळचे भारतीय.  परंतु, सध्या विदेशात (अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, स्वीडन इत्यादी ) व्यावसायिक कार्य करणाऱ्या 10 राष्ट्रभक्त सहकारी मित्र मंडळींनी या कार्यास पूर्ण आर्थिक सहयोग दिला असून स्थानीय निवासी, वनवासी कल्याण आश्रमचे संतोष जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचा वितरण कार्यात मोलाचा सहभाग लाभला. संपूर्ण तालुक्यातील विविध भागात या लाॅकडाऊनच्या कालावधीत गोरगरिबांना,  डोंगर पठारावरील  गोरगरिब  बांधवांना अन्नधान्याचे संच वाटप चालू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.