RTO : चारचाकी वाहनांसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

एमपीसी न्यूज – प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (RTO) येथे लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नव्याने सुरु होणाऱ्या चारचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी 5 जानेवारी 2013 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा.

अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. हा डीडी ‘आर.टी.ओ. पुणे’यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनूसचित बँकेचा पुणे येथील असावा. अर्जदाराने ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत छायाचित्र ओळखपत्र तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी वीज देयक, दूरध्वनी देयक, आधारकार्ड आदींची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.

एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज (RTO) असल्यास त्यांची यादी 6 जानेवारी रोजी सकाळी 10.30 नंतर कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. या यादीतील अर्जदारांनी लिलावाकरीता जास्त रक्कमेचा एकच डीडी ‘आर.टी.ओ. पुणे’यांच्या नावे 6 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा. डीडी किमान 301 रुपये पेक्षा जास्त रकमेचा असावा. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता प्रादेशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील सहकार सभागृह येथे संबंधीत अर्जदारांसमोर लिफाफे उघडून विहित शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केलेल्या अर्जदारास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.

Pimpri News: नवीन जिजामाता व थेरगाव रूग्णालयात सुसज्ज शस्त्रक्रीया संकुल उभारणार

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे च्या कार्यक्षेत्रातील पत्ता असलेल्या वाहनधारकांनीच अर्ज सादर करावेत, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.