Pune : दाभोळकर हत्याप्रकरणी सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

एमपीसी न्यूज – डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील अटक आरोपी सचिन अंदुरे याला पुणे न्यायालयाने सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए एस मुजुमदार यांनी हा निर्णय दिला आहे. काल शनिवारी त्याला औरंगाबाद येथून अटक केली होती. 

सचिन अंदुरे याला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. अंदुरे याने महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये विविध भागात शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. जिथे प्रशिक्षण घेतले त्या ठिकाणी सचिनला नेऊन त्याबाबत तपास करायचा आहे. हे प्रशिक्षण कोण आयोजित करत होतं, इतर कुणाचा यात सहभाग आहे, हे तपासण्याचं काम सुरु आहे. तसेच कटातील मुख्य सूत्रधार वीरेंद्रसिंह तावडे याच्यासोबत अंदुरे याचं संभाषण आणि संपर्क झालेला आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. तर बचाव पक्षाच्या वकिलांनी ही सीबीआयची नवी थिअरी असून आधीच्या तपासात त्यांनी सारंग अकोलकर व विनय पवार यांची नावं घेतली होती, असा युक्तिवाद केला.

दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायदंडाधिकारी मुजुमदार यांनी अंदुरे याला सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावाली आहे. त्यानुसार 26 ऑगस्टपर्यंत अंदुरे हा सीबीआयच्या ताब्यात राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.