Sangvi : मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; आईचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

एमपीसी न्यूज – मानसिक आजार झालेल्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहिल्याने आईला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यातच तिचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी पिंपळे सौदागर येथे घडली.

तन्मय दासगुप्ता (वय 36) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. तर शुक्ला दासगुप्ता (वय 65, दोघे रा. पिंपळे सौदागर) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्ला यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांना एकूण तीन मुले आहेत. त्यांचा एक मुलगा परदेशात नोकरी करतो तर मुलीचे लग्न झाले आहे. ती पिंपळे सौदागर येथेच राहण्यास आहे. मयत तन्मय हा मानसिक रुग्ण असल्याने शुक्ला यांचे त्याच्यावर विशेष प्रेम होते. तो आजारी असल्यामुळे त्याचे लग्न देखील जमत नव्हते. हीच काळजी काळजी शुक्ला यांना वाटत होती.

  • आजारपणाला कंटाळून सोमवारी रात्री तन्मयने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्याने कटरच्या सहाय्याने स्वतःचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्त पाहून त्याने गळफास घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी घरातील एक वायर पंख्याच्या हुकाला अडकवून स्टुलवरून उडी घेतली. त्याच्या वजनाने वायर तुटली मात्र, तोपर्यंत तन्मयचा श्वास थांबला होता. सकाळी उठल्यानंतर शुक्ला यांना तन्मयचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून मोठा धक्का बसला. या धक्क्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

सकाळी तन्मयची बहीण मॉर्निंग वॉकसाठी शुक्ला यांना फोन करत होती. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ती स्वतः तन्मयला नेण्यास घरी आली. बराचवेळ दार ठोठावूनही आतून आवाज आला नसल्याने तिने शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडले. यावेळी भाऊ आणि आईचा मृतदेह पाहून तिला देखील भोवळ आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.