Pimpri News: ‘हरित सेतू’ प्रकल्पाविषयी सूचना पाठवा, पालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन 2030 पर्यंतचा विचार करून हरित सेतू विकसित करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रकल्पाविषयी संकल्पना व सूचना पाठवण्यासाठी 20 नोव्हेंबर 2020  पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी ‘हरित सेतू’ प्रकल्पाविषयी सूचना पाठविण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

शहरातील विविध प्रभागांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेची 184 उद्याने व विकासयोग्य अतिरिक्त राखीव हिरव्या जागा आहेत. हरित सेतू उपक्रमाद्वारे शहरातील हिरवी क्षेत्रे व उद्याने एकमेकांशी जोडून, हिरव्या मोकळ्या जागांचे जाळे निर्माण करण्यात येईल. महापालिकेच्या सर्व उद्यानांना तसेच शहरात असणा-या हरित क्षेत्रांना पादचारी मार्ग (फुटपाथ) अथवा सायकल मार्गाने जोडण्यात येणार आहे.

यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि आपल्या अमूल्य सूचना व संकल्पना 20 नोव्हेंबर 2020  महानगरपालिकेकडे पाठवाव्यात असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिक आपल्या सूचना/ संकल्पना महानगरपालिकेच्या स्मार्ट सारथी अँपवर किंवा महानगरपालिकेच्या वेबसाइटवर फॉर्म (https://surveymonkey.com/r/823CFM8) भरून ऑनलाइन पाठवू शकतात. तसेच महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हरित सेतू उपक्रमासाठी बसविण्यात आलेल्याच्या सूचना पेटीमध्येही जमा करू शकतात.

नागरिकांच्या सहकार्यातून या प्रकल्पासाठी मास्टर प्लॅन तयार करणार आहे. विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांवर चर्चा करण्यासाठी तज्ञांची कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. नागरिकांनी पालिकेला पाठविलेल्या सूचना आणि न्यावीन्यपूर्ण संकल्पनांचे कार्यशाळेतील तज्ञांकडून मूल्यांकन केले जाईल व उत्तम कल्पनांची अंमलबजावणी या प्रकल्पात केली जाईल.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, शहरी नियोजन अधिकारी आणि डिझाइनर, स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागातून हरित सेतू उपक्रमाची मूलभूत रचना तयार या कार्यशाळेत तयार करण्यात येईल. शहरातील नागरिकांना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध व्हावे तसेच पर्यावरणपूरक जीवनमान अधिक उंचावण्यासाठी हा उपक्रम पथदर्शी ठरणार आहे. या शहराला राहण्यासाठी अतिशय उत्तम शहर बनविण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.

पर्यावरणपूरक साधनांचा प्रभावी वापर करून शहरभर विखरलेल्या हरित क्षेत्रांना एकमेकांना जोडल्यास शहराची पर्यावरणीय गुणवत्ता वाढून त्याचा लाभ शहरवासियांना होईल. शहर विकासात या उपक्रमाचे अनन्यसाधारण महत्व असणार आहे. पिंपरी चिंचवड शहराला आर्थिकदृष्ट्या परवडणारी घरे आणि राहण्यायोग्य असलेले देशातील सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी या उपक्रमाला अनेकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. सर्व बाबींचा व्यापक विचार करून हरित क्षेत्र जोडणी विकास आराखडा महापालिकेने शहर विकासाच्या दृष्टीने तयार केला आहे. देशातील अशा प्रकारच्या आराखड्याची अंमलबजावणी करणारे पिंपरी-चिंचवड हे प्रथम शहर ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.