Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 33 – ‘विमी’ अर्श से फर्श पर

एमपीसी न्यूज : परमेश्वराने तिला मृत्यूलोकात जन्माला घालताना विशेष (Shapit Gandharva) वेळ घेऊन घडवून पाठवले होते. तिचे सौंदर्य बावनकशी होते. त्याबरोबरच त्याने तिला यश, पैसा, कीर्ती सर्वकाही दिले होते. थोडक्यात काय तिचे आयुष्य म्हणजे अतिशय सुंदर आणि नजर लागावे असेच होते. मग तुम्हाला वाटत असेल की, ती खरोखरच भाग्यवान होती? होतीच!

पण त्या भाग्याला त्याने नेहमी प्रमाणे काळी तीट लावावी असे तिच्या आयुष्यात अनेक वादळे लिहूनच खाली पाठवले. तिला ते सर्वकाही मिळाले ज्याची अपेक्षा कुठल्याही मर्त्य माणसाला आयुष्यात असतेच असते; पण ते अतिशय क्षणिक होते. मुंबईसारख्या मायावी महानगरात तिच्याकडे प्रशस्त बंगला, गाड्या, घोड्या, पैसा, नावलौकिक सर्वकाही होते. पण, ते ‘त्याने’ जितक्या औदार्याने दिले; तितक्याच निष्ठूरतेने काढून घेतले अन् त्याचसोबत तिचे आयुष्य आयुष्य नव्हे तर शाप वाटावा इतके वाईट आणि दुःखद करून टाकले.

तिच्यावर इतकी वाईट वेळ आली होती की, एकेकाळी तारांकित आयुष्य जगणाऱ्या या ईश्वरी कलाकृतीला वयाच्या 35 व्या वर्षीच इहलोकीचा निरोप घ्यावा लागला. पण, त्याआधीही तिचे जगणे इतके भयंकर झाले होते की, तिला जगण्यासाठी नको-नको ते सर्व काही करावे लागले.

जिचे (Shapit Gandharva) जीवन म्हणजे अगदी ‘अर्श से फर्श तक’ असेच होते; ती म्हणजेच ‘हमराज’ या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर झळकून एका रात्रीच यशाचे शिखर गाठणारी सौंदर्यवती अभिनेत्री म्हणजेच ‘विमी’.

Shirur : पती-पत्नी शेतात राबताना गुड न्यूज; एकाच वेळी दोघेही पोलीस भरतीत पात्र

जालंधर येथील एका पंजाबी कुटुंबात जन्माला आलेली ही पंजाबी कुडी. स्वातंत्र्यपूर्व काळात 1943 साली हिचा जन्म झाला होता. तिची कौटुंबिक माहिती खरं तर अतिशय दुर्मिळ आहे. ती मूलतः स्वभावाने अतिशय धाडसी होती. तिने अगदी तरुण (की कमी?) वयातच त्याकाळच्या कोलकाता येथील सुप्रसिद्ध उद्योगपती शिव आगरवाल यांच्याशी विवाह केला होता. ज्याच्यापासून तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती.

मोठ्या घरातली असल्याने तशाच मोठमोठ्या लोकांमधे तिची उठबस होती. अशीच एका पार्टीच्या दरम्यान तिची भेट त्याकाळचे सुप्रसिद्ध संगीतकार रवी यांच्यासोबत झाली. पहिल्याच भेटीत रवी तिच्या सौंदर्यावर आणि एकंदरीत व्यक्तिमत्वावर चांगलेच प्रभावीत झाले. असे म्हणतात ना, हिऱ्याची कदर जौहरीच करू शकतो. तसेच अगदी रवीजी यांनी तिच्यातील प्रतिभा (स्पार्क) ओळखली आणि त्यांनी (Shapit Gandharva) तिची भेट थेट सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक बी.आर.चोप्रा यांच्याशी करून दिली.

त्यांनी तिला तिच्या नवऱ्यासोबत मुंबईला बोलावले. चक्क काही कालावधीतच तिला आपल्या ‘हमराज’ या चित्रपटासाठी नायिका म्हणून करारबद्धही केलं. हा चित्रपट 1967 साली रूपेरी पडद्यावर झळकला होता. यात तिच्या बरोबर नायक म्हणून होते सुप्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त, तर राजकुमार, बलराज सहानी, मुमताज, मदनपुरी, जीवन अशी तगडी स्टार मंडळी.  या चित्रपटात तिचे सहकलाकार होते. साहिर लुधियानवी यांची अवीट गाणी, रवीजी यांचे कर्णमधुर संगीत आणि बी.आर. चोप्रा यांचे दिग्दर्शन कौशल्य यामुळे या चित्रपटाने जोरदार यश मिळवले आणि विमी एका रात्रीतच यशाच्या शिखरावर पोहचली.

नीले गगन के तले, धरती का प्यार पले, ना मुंह छुपाके जियो ना सर झुका के जियो, तुम अगर साथ देने का वादा करो, किसी पत्थर की मूरत से-अशी आजही कानात गोड रुंजी घालणारी एकापेक्षा एक सुंदर गाणी. आणि तितकेच रोमांचक कथानक यामुळे या चित्रपटाने घवघवीत यश मिळवले आणि विमीने आपल्या या चित्रपटात आत्मविश्वासपूर्वक केलेल्या अभिनयाने आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या चित्रपटाच्या यशाने तिला पैसा, प्रसिद्धी सर्व काही मिळाले आणि त्याचसोबत आणखी काही चित्रपटही. मात्र यानंतर लगेचच तिला 1968 साली आलेल्या ‘आबरू’ या चित्रपटाने चांगल्या यशानंतर लगेचच अपयशाची चवही चाखवली. त्यानंतर आलेल्या ‘पतंगा’ या चित्रपटात तिच्याबरोबर शशी कपूर नायक म्हणून होता; मात्र हा चित्रपट सुद्धा अपयशीच ठरला आणि तिचे चित्रपटसृष्टीतले स्थान एकदम डळमळीत झाले.

त्यातच आलेल्या ‘वचन’ या चित्रपटाच्या अपयशाने तिला आणखीनच निराशेच्या गर्तेत नेवून टाकले. काल-परवापर्यंत तिच्या मागे-पुढे करणाऱ्यांनी या अपयशी काळात इथल्या रुक्ष आणि व्यावसायिक वृत्तीचे पुरेपूर प्रत्यंतर देत तिला दुर्लक्षित करायला सुरुवात केली. या वागणुकीने ती पूर्णपणे खचली. तिला यातून बाहेर पडण्यासाठी दारूचा आधार घ्यावा लागला.

दारू प्यायल्याने दुःख कमी होते, असं कुठल्या शहाण्याने कुठे लिहून ठेवलंय, हे आजतागायत कुणालाही, कुठेही बघायला मिळालेले नाही. दारूमुळे सर्वस्वाची राख-रांगोळी होते, हे मात्र सर्वांना अनेकदा बघायला मिळालेलं आहे. अगदी असंच विमीच्या बाबतीतही घडलं. सुरुवातीला औषध म्हणून ती दारू घ्यायला लागली अन् नंतर- नंतर ती इतकी तिच्या आहारी गेली की ..यानंतरचा तिचा काळ अतिशय कठीण असा होता. यश मिळणे सोपे पण ते टिकवणे जसे कठीण असते, अगदी तसेच आलेले अपयश पचवणेही खूप कठीण असते.

त्याला धीराने तोंड द्यावे लागते, मनाला खंबीर करावे लागते. जसे सुख चिरकाल टिकत नाही, तसेच अपयशही कायमस्वरूपी राहत नाही. पण हे सत्य मनाला कळत असूनही वळत नाही आणि कितीही मोठी, सुज्ञ व्यक्ती सुद्धा जराशा अपयशाने देखील सैरभैर होते. अशीच सैरभैर झाली विमी. लागोपाठच्या अपयशाने ती यशासाठी काहीही करायला तयार झाली. तिने असे काही सीन द्यायची तयारी दर्शवली, ज्याचा नुसता विचार सुद्धा कोणी त्या काळात करत नव्हते.

तिच्या या अचाट धाडसाने तिच्या नवऱ्याला तिच्यापासून दूर जाण्यास भाग पाडले. पण विमी यालाही बधली नाही. नवरा तिला सोडून कलकत्ता येथे परत गेल्यानंतर तिने ‘जॉली’ नावाच्या एका निर्मात्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहण्याचे धाडसही करून दाखवले; पण त्यानेही तिला फार काळ साथ दिली नाही. ज्याचा खूप वाईट परिणाम विमीवर झाला. ती पूर्णपणे व्यसनाच्या आधीन झाली. इतकी की तिला व्यसनाची पूर्ती करण्यासाठी स्वतःच्या शरीराचाही सौदा करावा लागला. शेवटी-शेवटी व्यसनाने तिच्या सौंदर्याची आणि शरीराचीही पुरती राख-रांगोळी केली.

असे म्हणतात की, ती शेवटी-शेवटी तर अतिशय स्वस्त पण स्वास्थ्यासाठी घातक अशा दारूचे प्राशन करू लागली, ज्यामुळे तिच्या यकृतावर अतिशय वाईट परिणाम झाला. तिच्या दुर्दैवाचे दशावतार आता आणखीनच अक्राळविक्राळ स्वरूप धारण करू लागले होते.

तिच्याकडे तिच्यावर इलाज करण्याइतपतही पुंजी उरली नव्हती. खंगलेल्या शरीराचा इलाज होऊही शकतो, पण खचलेल्या मनाचा इलाज होणे फार कठीण. अखेर या रूपगर्वितेच्या खचलेल्या मनाने आणि खंगलेल्या शरीराने 22 ऑगस्ट 1977 रोजी जगाचा निरोप घेत आपल्या खळबळजनक जीवन प्रवासाचा अंत केला. नानावटी हॉस्पिटलमध्ये एका सामान्य वार्डात एखाद्या बेवारस व्यक्तीसारखी ती पडून होती. तिला प्रचंड यश देवून नरकयातनासम अपयश देणाऱ्या परमेश्वराने अखेर तिची यातून सुटका केली असली, तरी तिचा अंतिम प्रवासही तसाच भयंकर आणि अंगाला काटा आणणारा होता. एका हातगाडीवरून तिचा बेवारस मृतदेह स्मशानभूमीत नेला गेला असे कळते. यापेक्षा अधिक दुःखद जीवन असेल तरी कुठले?

कदाचित त्याने तिला खूप मोठ्या सौख्यानंतर दिलेल्या त्याहून मोठ्या दुःखातून सुटका करून तिला मुक्त केले असेल. कदाचित त्याची खपामर्जी पुन्हा एकदा कृपादृष्टी झाली असेल, काय माहिती? तसेही असल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे भल्या भल्या विद्वानांनाही मिळाली नाहीत. मी तर अतिशय सामान्य माणूस. तो असे का वागतो, त्याचे त्यालाच माहीत. पण त्याने तिला आपल्याजवळ बोलावून घेतल्यानंतर तरी आनंदी ठेवावे आणि यानंतर असे खडतर आणि नरकप्राय आयुष्य कोणाच्याही प्राक्तनात लिहू नये. इतकीच त्याच्याचरणी प्रार्थना.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.